| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १५ जून २०२४
नुकतेच सोशल मीडियावर काही बातम्या व्हायरल होत होत्या, ज्यामध्ये दावा केला जात होता की, लवकरच ट्राय अनेक सिम असणाऱ्या लोकांकडून शुल्क आकारण्यास सुरुवात करू शकते. या बातमीमुळे लोकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण होते. पण, ही बाब पूर्णपणे निराधार आहे. ट्रायने स्पष्टपणे सांगितले आहे की, एकाधिक सिम असणाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क आकारण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. अनेक लोक त्यांच्या मोबाईलमध्ये 2 सिम कार्ड वापरत असतात. मात्र यातील एक सिम निष्क्रिय मोडमध्ये ठेवल्यास, तुम्हाला अशा सिम कार्डवर शुल्क भरावे लागेल. हे शुल्क एकरकमी किंवा वार्षिक आधारावर घेतले जाऊ शकते, अशा आशयाचे या बातम्या होत्या.
आता या बातम्या एक अफवा असल्याचे समोर आले असून, या अफवा पसरवणाऱ्यांना केवळ जनतेची दिशाभूल करायची आहे. अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी फक्त ट्रायच्या अधिकृत वेबसाइट किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अवलंबून रहा, असे ट्रायने सांगितले आहे.