Sangli Samachar

The Janshakti News

विजयी घोषित करुनही अमोल किर्तीकर हरले कसे? ठाकरे गटाने 19 ते 23 व्या फेरीचं मांडलं गणित, 650 मतांचा सांगितला फरक !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ जून २०२४
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत 19 व्या फेरीपासून पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी केला आहे. एआरओ (असिस्टंट रिटंनीग ऑफिसर) आणि आमच्या मतांमध्ये 650 मतांचा फरक आहे. 19 व्या राऊंडनंतर आमची मत मोजलीच नाही, असा खळबळजनक दावा अनिल परबांनी केला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

अनिल परब म्हणाले, 4 जूनला निकाल लागला यामध्ये अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला. हा सर्व संशयास्पद निकाल आहे. 19 व्या फेरीनंतर निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे डावलण्यात आली. प्रत्येक फेरीनंतर कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली याची आकडेवारी दिली जाते. प्रत्येक राउंडनंतर 19 व्या फेरीपर्यंत हे सगळं व्यवस्थित सुरु होतं. पक्षाचे प्रतिनिधी आकडेवारीची टॅली करतात. मग RO आकडेवारी फायनल करतात. RO आणि उमेदवारचा प्रतिनिधी यामध्ये अधिक अंतर होतं. मतं मोजून झाल्यानंतर फॉर्म 17C भरून द्यायचा असतो. ज्यामध्ये आपल्या उमेदवाराला किती मतं मिळाली हे द्यावं लागतं. पण फॉर्म अनेकांना दिले नाहीत. आमच्या टॅलीमध्ये 650 पेक्षा अधिक मिळाले आहेत. 650 मतांचा फरक आमच्या आणि त्यांच्या टॅलीमध्ये येतोय. निकाल जाहीर करण्याआधी निवडणूक अधिकारी सांगतात की, आम्ही निकाल जाहीर करतोय. मात्र यामध्ये काहीच सांगण्यात आलं नाही.


सीसीटीव्ही फुटेज देण्यास वेळखाऊपणा का ? अनिल परबांचा सवाल

निकालात गडबड वाटल्यानंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितलं तर दोन दिवसात देऊ असं आम्हाला सांगितलं. पण नंतर हे फुटेज देण्यास नकार दिला. कोर्टाच्या आदेशानुसार देऊ शकत नाही असं ते आता सांगत आहेत. मतमोजणीवेळी मोबाईल वापरला गेला, त्यावर कोणाचे फोन आले याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. 10 दिवसानंतर गुन्हा दाखल झाला. या 10 दिवसात मोबाईल बदलले गेले असा आमचा आरोप आहे. गुरव कोण आहे? अधिकाऱ्याने यांचा मोबाईल वापरला का? सगळ्यांची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली.

आम्ही कोर्टात याचिका दाखल करणार : अनिल परब

अनिल परब म्हणाले, हा विजय आमचा आहे. हा विजय सरकारी यंत्रणेचा वापर करून हिरावला गेला. आरओचा इतिहास तपासा, किती भ्रष्टाचारच्या केसेसमध्ये त्या आहेत. इलेक्शन कमिशनने तक्रार घेतली पाहिजे यावर चौकशी व्हावी. आम्ही दोन दिवसात याचिका कोर्टात दाखल करू. 19 ते 23 फेरीमध्ये हा 650 मतांचा फरक आहे. रेटून नेण्याचं काम आरओने केलं. आम्ही पीपल रिप्रेजेंस्टेशन अ‍ॅॅक्ट अंतर्गत सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करणे यावर आम्ही याचिका दाखल करणार आहोत.