Sangli Samachar

The Janshakti News

भाजपचं ठरलं, 155 जागांवर लढणार ! मित्रपक्षांना किती जागा देणार ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपा आता शहाणी झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षाला चुचकारत तब्बल 155 जागावर उभे करणार आहे. महायुतीतील शिंदे शिवसेनेला 60 ते 65 तर अजित पवार राष्ट्रवादीला 50 ते 55 जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. इतर मित्र पक्षांना 15 जागा सोडण्यात येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जागा वाटपाचा घोळ सुरू होता. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक वेळ मिळू शकला नाही. तशातच पारंपारिक मतदारांचा नाराजीचा फटका ही भाजपला पर्यायाने महायुतीला बसला. या पार्श्वभूमीवर आता वस्तुस्थितीची जाणीव करून देत प्राथमिक चर्चेत एकनाथ शिंदे शिवसेनेतील नेत्यांची तसेच अजित पवार राष्ट्रवादी गटातील नेत्यांचे समजूत काढण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


निवडणूक आयोग महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक घेण्यासाठी तयारीला लागले आहे. त्यामुळे तत्पूर्वीच विधानसभेच्या जागा वाटपाची एकमताने तयारी करून निवडणुकीला सामोरे जायचे धोरण महायुतीतील सर्वच पक्षांनी आखले आहे. त्यानुसार प्राथमिक चर्चा झाली असून लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांचा टक्का लक्षात घेत विधानसभा निवडणुकीचे जागावाटप ठरविण्यात आले असल्याची माहिती महायुतीतील अधिकृत सूत्रांनी दिली.

लोकसभेतील चुका टाळत एक महायुती संघपणे विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाणार असल्याचे या सूत्राने सांगितले. त्यानुसार विधानसभा मतदार संघात ज्या पक्षाचे प्राबल्य असेल तेथे त्या पक्षाला जागा सोडायची. तेथे सर्वच पक्षांनी कुरघोडी न करता निवडणूक प्रचार करायचा असे वरिष्ठ पातळीवरून ठरले आहे, असे या सूत्राने सांगितले.