| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ मे २०२४
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या घरी सुरक्षा यंत्रणेत कार्यरत असलेल्या, जळगाव येथील जामनेर येथे राहणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने आपल्या गावी राहत्या घरी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश कापडे असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांचे वय 40 वर्षे होते. प्रकाश हे 2009 च्या बॅचमध्ये भरती झाले होते. प्रकाश कापडे हे मुंबईत सचिन तेंडुलकरच्या घरी सुरक्षा रक्षकाचे काम करत होते. पण आठ दिवसांपासून कापडे मुंबई येथून जामनेर येथे आपल्या गणपती नगर येथील घरी आले होते.
कापडे यांनी आपल्या अधिकृत बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, ते सध्या क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या घरी सुरक्षेत तैनात होते. अनेक व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी त्यांनी कर्तव्य बजावलं आहे. एसपी जळगाव महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, जवानाने स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली.
याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अद्याप काहीही संशयास्पद समोर आलेले नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रकाश कापडे एसआरपीएफ ग्रुप 8 मध्ये तैनात होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी प्रकाश गोविंद कापडा यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना रात्री 2 वाजता घडली. या घटनेबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलीस मृताच्या कुटुंबीयांचीही चौकशी करत आहेत.