yuva MAharashtra DRDO ला मोठं यश; रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम-2 ची यशस्वी चाचणी !

DRDO ला मोठं यश; रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम-2 ची यशस्वी चाचणी !



| सांगली समाचार वृत्त |
जत - दि. ३१ मे २०२४
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) हवेतून जमिनीवर हल्ला करणाऱ्या रुद्रम-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलीय. हे क्षेपणास्त्र आज हवाई दलाच्या लढाऊ विमान सुखोई-३० (Su-30MKI) मधून ओडिशाच्या किनारपट्टीवर सोडण्यात आले. डीआरडीओने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिलीय. उड्डाण चाचणीत सर्व चाचणीचे उद्दिष्टे पूर्ण झाल्याचे DRDO ने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. यामध्ये प्रोपल्शन सिस्टीमपासून कंट्रोल आणि मार्गदर्शन अल्गोरिदमपर्यंत सर्व गोष्टींची पुष्टी करण्यात आल्याचं डीआरडीओनं सांगितलं.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ, हवाई दल आणि उद्योग जगताचे अभिनंदन केले. या चाचणीच्या यशामुळे रुद्रम-२ च्या भूमिकेची पुष्टी झालीय. त्यामुळे भारतीय सशस्त्र दलाची ताकद अनेक पटींनी वाढेल, असं राजनाथ सिंह म्हणालेत.


संरक्षण मंत्रालयाने याची माहिती देताना म्हणाले की, रुद्रम-2 क्षेपणास्त्राच्या उड्डाण चाचणीने सर्व चाचणी उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. भारताने बुधवारी ओडिशाच्या किनारपट्टीवर भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० लढाऊ विमानातून हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या 'रुद्रम' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. "DRDO ने २९ मे रोजी सकाळी ११.३० वाजता भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० MK-I प्लॅटफॉर्मवरून रुद्रम-II हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली," असे मंत्रालयाने म्हटलंय

रुद्रम-II ही स्वदेशी विकसित सॉलिड प्रोपेलेंट एअर-लाँच क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी शत्रूच्या विविध लक्ष्यांना नष्ट करण्यास सक्षम आहे. विविध DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) प्रयोगशाळांनी विकसित केलेले अनेक अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञान क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये याचा समावेश आहे.

रुद्रम-II ही नवीन आवृत्ती आहे.याआधीच्या आवृत्ती रुद्रम-१ ची चाचणी चार वर्षांपूर्वी फायटर जेट सुखोई-३० एमकेआयने केली होती. रुद्रम-२ हे सर्वोत्कृष्ट क्षेपणास्त्रांपैकी एक आहे आणि त्याचा उद्देश शत्रूच्या अनेक प्रकारच्या हल्ल्यांना निष्प्रभ करणे हा आहे. भारताकडे सध्या रशियन रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र Kh-३१ आहे. रुद्रम क्षेपणास्त्र Kh-३१ ची जागा घेईल.