yuva MAharashtra "तीन दिवसांत माफी मागा अन्यथा."; CM शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस !

"तीन दिवसांत माफी मागा अन्यथा."; CM शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० मे २०२४
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वकिलामार्फत ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा या नोटीशीमधून देण्यात आला आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. त्यामुळेच राऊत यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. राऊत यांनी रविवारी मुखपत्रातून राज्यातील लोकसभा निवडणुकांवर भाष्य करताना, महायुतीमध्ये आलबेल नसल्याचे म्हटले होते.

तसेच लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली होती. गांजा पिऊन लेख लिहिणाऱ्यांवर मी बोलत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता एकनाथ शिदेंकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.


संजय राऊत यांनीही नोटीसवर बोलताना म्हटले की, गैरसंविधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला एका कायदेशीर नोटीस बजावली आहे. अतिशय मनोरंजक आणि अनेक हास्यास्पद राजकीय दस्तावेजांपैकी हा एक म्हणत संजय राऊत यांनी या नोटीसची खिल्ली उडवली आहे.