| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २९ मे २०२४
सांगली- कोल्हापूर जिल्ह्यांत महापूर येऊ नये, यासाठी धरणातील विसर्ग करताना सतर्क राहा. आलमट्टी धरणातील विसर्गाबाबतही समन्वय ठेवा. आंतरराज्य बैठक घेऊन विसर्ग करण्याबाबत निर्णय घ्या, जेणेकरून महापूर नियंत्रणात राहील', अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आज त्यांनी राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
कोल्हापुरातून या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'या वर्षी राज्यात मॉन्सूनची स्थिती चांगली असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण अधिक असेल. अशा वेळी महापुराची स्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवा. कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घ्या. आलमट्टी धरणावर एक जलअभियंत्याची नियुक्ती करा. राज्यातील धरणातून विसर्ग करताना समन्वय ठेवा.
महापुराची स्थिती उद्भवल्यास निवारा केंद्रे सर्व सुविधांनी सज्ज ठेवा. पूरग्रस्तांना चांगले अन्न, औषधे यांची व्यवस्था करा. जनावरांना चारा कमी पडणार नाही, याची काळजी घ्या. पुराची तीव्रता वाढल्यास तातडीने नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करा. एनडीआरएफ पथके तैनात करा. विद्युतपुरवठा आणि दूध्वनी व्यवस्था ठप्प होणार नाही, यासाठी उपाययोजना करा. महापुराच्या काळातही पिण्याचा पाणीपुरवठा सुरळीत राहील, याचीही खबदरारी घ्या. ज्या गावांना, नागरी वस्तींना भूस्खलनाचा धोका आहे तेथे तातडीने उपाययोजना करा.' या बैठकीला महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
या उपाययोजना अत्यावश्यक
धोक्याची सूचना देणारी सार्वजिक व्यवस्था सक्रिय करा.
पूरग्रस्त गावांमधील नागरिकांना योग्यवेळी सुरक्षितस्थळी पोहोचवा.
धरणातील विसर्ग करताना समन्वय ठेवा.
वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही, याची काळजी घ्या.