yuva MAharashtra खासदारकीचे विमान टेकऑफ होण्याआधीच पेटला वाद, आगामी विधानसभेसाठी 'महायुती'मध्ये नेत्यांच्यात स्पर्धा !

खासदारकीचे विमान टेकऑफ होण्याआधीच पेटला वाद, आगामी विधानसभेसाठी 'महायुती'मध्ये नेत्यांच्यात स्पर्धा !



| सांगली समाचार वृत्त |
इस्लामपूर - दि. २४ मे २०२४
एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील यांनी मतदारांसाठी आभार मेळावा घेतला. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील माने यांचे दिल्ली विमान टेकऑफ होण्याअगोदरच इस्लामपुरातील नेत्यांच्यात श्रेयवाद आणि निष्ठेवरून वादाला तोंड फुटले आहे. आगामी विधानसभेच्या उमेदवारीची स्पर्धा ही यामागील राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे.

गत विधानसभा निवडणुकीत इस्लामपूरचे तत्कालीन नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपकडून उमेदवारी मागितली होती. परंतु मतदारसंघ शिवसेनेला गेला. त्यामुळे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, आनंदराव पवार, भीमराव माने यांनी हुतात्मा संकुलातील गौरव नायकवडी यांना ताकद देऊन शिवसेनेत घेतले. तेव्हाच निशिकांत पाटील यांनी बंडखोरी करून इस्लामपूर मतदारसंघात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपमध्येच स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून विधानसभेची तयारीचे प्रयत्न सुरू केले आहेत.


हातकणंगलेतून लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमधूनही युद्धपातळीवर प्रयत्न झाले. परंतु मतदारसंघ शिवसेनेला गेला. तेव्हापासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली. भाजपमधील नेत्यांत पूर्वीपासूनच अंतर्गत वाद आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सवतासुबा मांडून भाजपचाच प्रचार करत असल्याचा दावा केला.

लोकसभेवर टार्गेट - विधानसभेवर डोळा

महायुतीतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजपचे विक्रम पाटील, राहुल महाडिक, अमित ओसवाल, गजानन फल्ले, मनसेचे सनी खराडे यांनी भाजपवरील पक्षनिष्ठेवरून थेट जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनाच टार्गेट केले. यामध्ये निशिकांत पाटील, राहुल महाडिक, आनंदराव पवार, भीमराव माने आणि गौरव नायकवडी आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत यांना लोकसभेची उमेदवारी मागितली. पण ती न मिळाल्याने त्यांनी विधानसभेवर डोळा ठेवून आरोपप्रत्यारोप केल्याची चर्चा आहे. त्यानिमित्ताने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

भाजपची सत्ता येते, त्यावेळी नेत्यांची मोठ्या प्रमाणात आयात होते. हेच नेते सत्तेचा पूर्णपणे फायदा उठवतात आणि पक्षात दुफळी करतात. इस्लामपूर मतदारसंघात आमच्या महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करण्याचे प्रयत्न होतात, याला आयात आणि सत्तेचे लाभ घेतलेले नेतेच कारणीभूत आहेत. हेच नेते गटबाजी करून विरोधकांना निवडणूक सोपी करून देतात. -विक्रम पाटील, ज्येष्ठ नेते (भाजप)