yuva MAharashtra बॉयफ्रेंडचा मित्र बनला मोहरा, १९ वर्षांची नात निघाली आजीच्या हत्येची मास्टर माईंड !

बॉयफ्रेंडचा मित्र बनला मोहरा, १९ वर्षांची नात निघाली आजीच्या हत्येची मास्टर माईंड !



| सांगली समाचार वृत्त |
डेहराडून - दि. १७ मे २०२४
उत्तराखंडमधील ज्वालापूरमधील मोहल्ला चाकलान येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका वृद्ध महिलेच्या हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वृद्धेची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर तिच्याच नातीने केल्याचे उघड झाले आहे. बारावीत शिकत असलेल्या १९ वर्षीय नातीला आजीचं तिला बोलणं पसंत नव्हतं. त्यामुळे तिने तिच्या बॉयफ्रेंडच्या मित्रासोबत मिळून ६३ वर्षीय आजी अर्चना शर्मा हिची हत्या केली. 

मंगळवारी संपूर्ण कुटुंब घराबाहेर असताना नियोजनबद्ध रीतीने अर्चना शर्मा यांची हत्या करण्यात आली. हत्येसाठी आखण्यात आलेल्या प्लँननुसार उदित झा नावाचा तरुण मोहल्ला चकलान येथील घरी आला. त्याने अर्चना शर्मा यांना त्याची ओळख त्यांच्या नातवाचा मित्र अशी सांगितली.त्याने अर्चना शर्मा यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. अर्चना शर्मा या त्याला फ्रिजमधून पाणी आणून देण्यासाठी वळल्या. त्याचवेळी उदित याने त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर हातोड्याने वार केला. त्यानंतर तो तिथून फरार झाला. मंगळवारी दुपारी बाहेर गेलेले कुटुंबीय परत आले तेव्हा अर्चना शर्मा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्थितीत सापडला.


दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली. पोलिसांनीही सर्व बाजूंनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामधून संशयित तरुण ये जा करताना दिसून आला. पोलिसांनी ओळख पटवून त्याला तपासले. त्याच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली. त्याने स्वतःची ओळख उदित झा अशी सांगितली. मृत महिलेची नात, तिचा बॉयफ्रेंड अनुराग, तो (उदित), त्याची गर्लफ्रेंड असे चारही जण मित्र होते. दरम्यान, मृत महिलेच्या नातीने उदितला त्याचा आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा प्रायव्हेट व्हिडिओ तिच्याकडे असल्याचे सांगितले. तसेच उदित याने तिच्या आजीची हत्या न केल्यास ती तो व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी तिने दिली. मंगळवारी आजी घरी असल्याची माहितीही तिनेच दिली होती.