नवी दिल्ली - दि. २ मे २०२४
पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील एकूण मतदानाची आकडेवारी काल जाहीर केली. त्यानंतर आयोगाने आकडेवारी इतक्या उशिरा का जाहीर केली यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मतदानाची टक्केवारी नेमके कधी जाहीर केली जाते आणि आयोगाकडे ती कुठून येते या विषयी आपण जाणून घेणार आहे.
एकीकडे देशभरात लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. नेत्यांच्या एकमेकांवरील आरोपांचे लाऊडस्पीकरही जोरात वाजतायत. तर दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोग मतदारांना अनेक मार्गांनी आवाहन करतंय. देशभरात पाच टप्प्यांपैकी दोन टप्प्यांतील मतदान पार पडलंय. मात्र आता या मतदानाच्या टक्केवारीवरून नवा वाद निर्माण सुरू झाला आहे.
विरोधी पक्षाच्या नेत्यांची निवडणूक आयोगावर टीका
पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची एकूण टक्केवारी निवडणूक आयोगाने कालच जाहीर केली . मतदानाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेली आकडेवारी आणि निवडणूक आयोगाने जाहीर केलेली अंतिम आकडेवारी यातील फरकावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
टप्पा मतदान प्रसिद्धीपत्रक कधी ?
पहिला टप्पा 19 एप्रिल रात्री 7.55 वाजता
दुसरा टप्पा 26 एप्रिल रात्री 9 वाजता
राज्य आधीचे टक्के अंतिम टक्केवारी
उत्तर प्रदेश 54.82 टक्के 55.19 टक्के
बिहार 54.91 टक्के 59.45 टक्के
मध्य प्रदेश 56.60 टक्के 58.59 टक्के
राजस्थान 63.82 टक्के 65.03 टक्के
महाराष्ट्र 54.34 टक्के 62.71 टक्के
पश्चिम बंगाल 71.84 टक्के 76.98 टक्के
आजपर्यंत कधीच उशीर झाला नाही
पहिल्या टप्प्यानंतर 11 दिवसांनी आणि दुसऱ्या टप्प्यानंतर 4 दिवसांनी मतदानाची अंतिम टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. इतका उशीर आजवर कधीही झालेला नाही. ही आकडेवारी आयोगाने आधी जाहीर केलेल्या मतदानाहून 3 ते 5.75 टक्के अधिक आहे. मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी टक्केवारी दिली आहे. हे सारेच संशयास्पद वाटते आहे.
अंतिम आकडेवारीतील फरकावर बोट
निवडणूक आयोगाने मतदानाची आकडेवारी जाहीर केली मात्र अंतिम आकडेवारीतील फरकावर बोट ठेवत अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवलीय. निवडणूक आयोगाने आकडेवारी जाहीर करायला अकरा दिवस लावले यावरून राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनीही टीका केली आहे. एकीकडे विरोधकांनी मतदानाच्या अंतिम आकडेवारीत प्रमाण वाढल्याबद्दल टीका केली असली तरी भाजपने मात्र स्वागत केले आहे...
यावेळी निवडणूक आयोगाने एकूण मतदान आकडेवारी ॲप वर दाखवण्याचा प्रयोग पहिल्यांदा केला आहे तसेच संपूर्ण निवडणूक कार्यक्रम निष्कर्षाप्रत येण्यापूर्वी अंतिम आकडेवारी जाहीर करण्याचा हा पहिला प्रयोग असल्याचं कळतंय .तरीही मतदानाची आकडेवारी उशिरा जाहीर केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठलीय.