| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ मे २०२४
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा आल्या असल्या तरी त्याची भरपाई विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात अधिक जागा पदरात पाडून करू, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मंगळवारी 'लोकसत्ता लोकसंवाद' या कार्यक्रमात बोलताना दिले. तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्यापैकी कोण, असा प्रश्न निर्माण होईल तेव्हा भविष्याचा विचार करता अजित पवारांनाच अधिक पसंती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, ही फूट पडण्यामागची कारणमीमांसा, शरद पवार यांनी राष्ट्रीय राजकारणात दवडलेली संधी, अजित पवार गटाचे भवितव्य आणि राष्ट्रवादीत काका-पुतणे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता… यावर प्रफुल पटेल यांनी 'लोकसत्ता लोकसंवाद' कार्यक्रमात सविस्तर भाष्य केले.
लोकसभेत सारासार विचार करूनच आम्ही कमी जागा स्वीकारल्या. आमची जास्त जागांची मागणी होतीच, पण तीन पक्षांमध्ये जागावाटप करताना अनेक अडचणी होत्या. हे लक्षात घेऊनच आम्ही अधिक ताणून धरले नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार चार मतदारसंघांमध्ये लढत आहेत. परभणीची जागा आम्ही तिन्ही पक्षांचा विचार करूनच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासाठी सोडली. साताऱ्याच्या जागेवर आमचा दावा होता. पण उदयनराजे यांच्यासाठी ही जागा आम्ही सोडली. पण त्या बदल्यात राज्यसभेची एक जागा देण्याचे आश्वासन भाजपने आम्हाला दिले आहे. याचाच अर्थ आम्हाला सहा जागा मिळाल्या आहेत, असे पटेल यांनी सांगितले.
शरद पवार हे वर्तमानातील नेते आहेत, तर भविष्याचा विचार करता अजित पवार यांना अधिक पाठिंबा मिळेल. शरद पवार यांच्याबद्दल आमच्या सर्वांच्या मनात आजही आदराची भावना आहे. मी तर कधीच त्यांच्याविरोधात बोलणार नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलेले आहे.