| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. ७ मे २०२४
भारतीय मसाल्यांची जगात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. देशविदेशात भारतीय मसाल्यांची मागणी वाढल्याने बदनाम करण्यासाठीच आंतरराष्ट्रीय षडयंत्र रचल्याचा आरोप महाराष्ट्र मसाला उद्योग संघटनेचे प्रमुख अनिल अहिरकर यांनी पत्रपरिषदेत केला. यावेळी पत्रपरिषदेत प्रकाश वाघमारे, प्रकाश कटारिया, महेंद्र जैन, विजय पोटे, नरेंद्र काळे, अतुल ठकराल आदी उपस्थित होते.
देशविदेशात ग्राहकांमध्ये भारतीय मसाल्यांवर विश्वास निर्माण झाला आहे. दरम्यानच्या काळात खप सुध्दा वाढला आहे. त्यामुळे विदेशी कंपण्या संकटात सापडल्याने विविध षढयंत्र रचून बदनाम करण्याचा डाव रचल्या जात आहे. मुळात भारतीय मसाले आणि खाद्यपदार्थांच्या निर्यातीमुळे सरकारला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत असताना चीनकडून चूकीचा प्रचार जाणीवपूर्वक केल्या जात आहे. यापूर्वी मोहरीच्या तेलावर काही देशांनी बंदी घातली होती. भारतीय तांदूळ आणि दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या भाज्या किंवा मासे यांच्याकडेही संशयाने पाहिले जात होते. एफएसएसएआय संस्थेकडून मसाले आणि खाद्यपदार्थांची नियमितपणे तपासणी करण्यात येत असल्याने ग्राहकांनी आमच्या उत्पादनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.