| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ मे २०२४
माधवनगर रोडवरील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मंदगतीने सुरू असतानाच आता महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनमार्फत पंचशीलनगर रेल्वे उड्डाणपूल उभारणीची तयारी केली जात आहे. याठिकाणी मार्किंगच्या कामास सुरुवात झाली असून, महामंडळाने कामासाठी येथे डेपोही उभारला आहे.
जुना बुधगाव रोडवरील पंचशीलनगर येथील रेल्वे फाटक क्रॉसिंग नंबर १२९वर हा उड्डाणपूल होणार आहे. केंद्र शासनाच्या 'सेतू भारतम्' या योजनेंतर्गत गडकरी यांना या पुलाचा प्रस्ताव दोन वर्षापूर्वी दिला होता. २६ मार्च २०२२ रोजी सांगली दौऱ्यावेळी गडकरी यांनी या प्रस्तावास मान्यता दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील नऊ उड्डाणपुलांच्या कामांत सांगलीच्या या कामाचा समावेश करण्यात आला. ३ जून २०२३ मध्ये पुण्यात व्हर्च्युअल पद्धतीने या कामाचे भूमिपूजन झाले होते.
चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर पर्यायी रस्ता म्हणून जुना बुधगाव रस्त्याचा वापर सुरू झाल्याने येथील उड्डाणपुलाचे काम थांबविले होते. चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ते कधी पूर्ण होईल, याची खात्रीशीर माहिती कोणालाही नाही. अशा स्थितीत आता पर्यायी जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
काम कधी सुरू होणार ?
पंचशीलनगर येथील उड्डाणपुलाचे काम कधी सुरू होणार याबाबतची माहिती मिळविण्यासाठी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
...तर प्रवाशांचा वनवास वाढणार
चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपूल बंद असतानाच पंचशीलनगरच्या पुलाचे काम सुरू झाले तर प्रवाशांना गावाला वळसा घालून प्रवास करावा लागेल. त्यांचा वनवास आणखी खडतर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मार्किंगला सुरुवात
महामंडळाने गुरुवारी जुना बुधगाव रस्त्याच्या दक्षिण बाजूने मार्किंगला सुरुवात झाली. पुलाची सुरुवात जिथून होते तिथून आखणी करण्यात आली आहे. याशिवाय महामंडळाने याठिकाणी डेपोही उभारला आहे.
७० कोटी रुपये मंजूर
या उड्डाणपुलासाठी अंदाजे ७० कोटी रुपये खर्च होणार आहे. तितक्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. सांगली ते माधवनगरसाठी मोठा पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. पुराच्या काळातही या रस्त्याची मदत होईल.