yuva MAharashtra "राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले, पण सांगलीत तर..."; रोहित पाटील

"राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले, पण सांगलीत तर..."; रोहित पाटील



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ मे २०२४
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान ०१ जून रोजी होणार आहे. तर, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीत मिळणाऱ्या जागांबाबत विविध दावे केले जात आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्टार प्रचारक असलेले रोहित पाटील यांनीही महाविकास आघाडीला चांगले यश मिळण्याबाबत दावा केला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्टार प्रचारक म्हणून काम पाहिले. राज्यभरातील अनेक ठिकाणी रोहित पाटील यांनी प्रचार केला. तसेच महाविकास आघाडीच्या प्रचारसभा, रॅली यांमध्येही रोहित पाटील यांनी सहभाग घेतला होता. वर्धा, दिंडोरी, शिरूर, बारामती, माढा, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, नाशिक या मतदारसंघांत रोहित पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या. यानंतर आता मीडियाशी बोलताना रोहित पाटील यांनी या लोकसभा निवडणुकीत राज्यातील चित्र कसे दिसले, यावर प्रतिक्रिया दिली.

राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले

मतदारांमध्ये भाजपविरोधी लाट असल्याचे दिसून आले. महागाई, बेरोजगारी, उद्योगधंदे, नोकऱ्या याबाबत मतदार बोलत होते. महाविकास आघाडीने या मुद्द्यांना प्राधान्य दिले असल्याने मतदार महाविकास आघाडीच्या मागे उभे असल्याची चित्र सर्वत्र दिसले. राज्यात भाजपाविरोधी लाट जाणवत होती. तसेच सांगलीमध्ये वातावरण असेल, असे सूचक विधान रोहित पाटील यांनी केले.

दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीचे काम केले नाही, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना, याचे उत्तर ०४ जून रोजी मिळेल, असे सांगत यावर अधिक बोलणे टाळल्याचे बोलले जात आहे.