| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ मे २०२४
मध्य रेल्वेने मागील महिन्यात चार उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना सांगलीत थांबा मंजूर केला होता. यातील हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेसला जेव्हा थांबा मंजूर झाला तेव्हा तिकिट बुकिंग फुल्ल झाले होते. प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केल्यानंतर आता या गाडीच्या ४ व ११ जून रोजी जादा फेऱ्या मंजूर केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागाने काही दिवसांपूर्वी सहा उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना मंजुरी दिली. मध्य रेल्वेमार्फत ज्यावेळी थांबे निश्चित केले गेले त्यात सुरुवातीला सांगलीला थांबा दिला नाही. त्यामुळे सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने आंदोलनाचा इशारा दिला होता. सांगलीला सहा गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी केली होती.
त्याची दखल घेत मध्य रेल्वेने अखेर चार गाड्यांना सांगली रेल्वेस्थानकावर थांबा मंजूर केला आहे. हुबळी-मुझफ्फरपूर एक्स्प्रेस (गाडी क्र. ०७१५), मुझफ्फरपूर ते हुबळी (गाडी क्र. ०७१६), हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेस (गाडी क्र. ०६२२५), ऋषिकेश ते हुबळी (गाडी क्र. ०६२२६) या चार गाड्यांना सांगलीत थांबा देण्यात आला.
हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेसला जेव्हा थांबा मंजूर केला गेला तेव्हा पहिल्या फेरीची सर्व तिकिटे विकली गेली होती. त्यामुळे सांगलीतून अनेक प्रवाशांना जनरल तिकिटावर प्रवास करावा लागला. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. प्रवाशांच्या या तक्रारीची दखल घेत आता रेल्वेने ४ व ११ जून अशा दोन फेऱ्या वाढवून दिल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, विटा, तासगाव, आष्टा, इस्लामपूर येथील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
६०० तिकिटे उपलब्ध
हुबळी-ऋषिकेश एक्स्प्रेसमध्ये स्लीपर क्लासची ५०० तर एसी स्लीपर क्लासची १०० अशी एकूण ६०० तिकिटांची उपब्लधता आहे. प्रवाशांनी आताच तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग करावे, असे आवाहन रेल्वे डेव्हलपमेंट ग्रुप व नागरिक जागृती मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
हुबळी-ऋषिकेश गाडी मंगळवारी येणार
हुबळी-हरिद्वार-ऋषिकेश विशेष रेल्वे गाडी सांगलीतून मंगळवारी पहाटे ३:३५ वाजता रवाना होईल. त्यानंतर सातारा, पुणे, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडोबा, भोपाळ, बिना, झांसी, मथुरा, दिल्ली, निजामुद्दीन, गाझियाबाद, मिरज सिटी, खटवली, मुजफ्फरनगर, देवबंद, टपरी, रुरकी या ठिकाणाहून बुधवारी दुपारी ४:१० वाजता हरिद्वारला जाईल. तिथून पुढे ऋषिकेशला सायंकाळी ६:४५ला पोहोचेल.
रविवारी सांगलीला परतणार
ऋषिकेश-हरिद्वार-हुबळी अशा परतीच्या मार्गावर जाताना हरिद्वार रेल्वे स्टेशनवरून प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ५:५५ वाजता सुटून हरिद्वार येथे सायंकाळी ६:५८ला येईल. तिथून पुन्हा त्याच मार्गावरून धावत ही गाडी रविवारी सकाळी ११.२७ वाजता सांगलीत दाखल होईल.