| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ११ मे २०२४
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी देशभरातील ६५ जणांना पद्म सन्मान प्रदान करण्यात आले, यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. यापैकी तिघांना पद्मभूषण तर तीन जणांना पद्मश्री सन्मान देण्यात आला. अभिनेते चिरंजीवी, अभिनेत्री आणि नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना पद्मविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातील होर्मुसजी एन. कामा आणि कुंदन व्यास यांना साहित्य, शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रासाठी तर डॉ. आश्विन मेहता यांना औषधी क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले, तसेच समाजसेवेसाठी शंकरबाबा पापळकर यांना, क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी उदय देशपांडे यांना, तर औषधी क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री सन्मान देण्यात आला.
या समारंभाला उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आदी यांसह अनेक नेते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या या समारंभात दोन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि ५५ पद्मश्री प्रदान करण्यात आले.