yuva MAharashtra काळ्या कोटाच्या विरोधात वकीलच पोहोचले कोर्टात !

काळ्या कोटाच्या विरोधात वकीलच पोहोचले कोर्टात !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २९ मे २०२४
गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढू लागलाय. उष्णतेमुळे अंगाची लाही होत आहे. उष्मघातामुळे काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. देशभरात तापमानाचा पारा वाढलेला आहे, दुसरीकडे दिल्लीत वकिलांच्या काळ्या कोटचा मुद्दा तापलाय. उन्हाळ्यात वकिलांना काळा कोट किंवा काळ्या रंगाचा गाऊन परिधान करण्यापासून सुट द्यावी अशी मागणी वकिलांनी केलीय. या मागणीसाठी वकिलांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. वकील शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी ही याचिका दाखल केलीय.

उन्हाळ्यात काळा कोट परिधान करताना वकिलांना अडचणी आणि आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. काळा कोट आणि गाऊन हा ब्रिटिश ड्रेस कोड म्हणून लागू करण्यात आलाय. पण अंमलात आणताना भारतातील हवामानाचा विचार केला गेला नाही, असं या याचिकेत म्हटलंय. अशा परिस्थितीत वकिलांचा ड्रेस कोड ब्लॅक अँड व्हाईट का ठेवण्यात आला, जगातील कोणत्या देशात त्याची सुरुवात झाली हे प्रश्न तुमच्या डोक्यात नक्कीच आले असतील. याची माहिती आपण घेऊ.


वकिलांचे कपडे ब्लॅक अँड व्हाईट का असतात ? कोणत्याही कार्यक्रमाचा किंवा संस्थेचा ड्रेस कोड तेथील शिस्त दर्शवत असतो. वकिलांच्या ड्रेस कोडमध्येही हीच शिस्त दिसून येते. काळा रंग हा एक रंग आहे जो अधिकार आणि शक्ती दर्शवतो. हा रंग न्यायाधीशांना समर्पित आहे. तर वेळी, पांढरा रंग प्रकाश, चांगुलपणा आणि शुद्धतेचे प्रतीक असतो.

कायदेशीर व्यवस्था ही सामान्य माणसाची न्यायाची एकमेव आशा असते. त्यामुळे याचे तिचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पांढऱ्या रंगाची निवड करण्यात आलीय. याचिकाकर्ता आणि प्रतिवादी दोघांचे वकील समान ड्रेस कोड घालतात.

ब्रिटीश ड्रेस कोड भारतात कसा लागू झाला

ही प्रथा इंग्रजांनी सुरू केली होती. ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या ठिकाणी वसाहती होत्या, तिथे त्यांनी त्यांची संस्कृती आणि चालीरीती राबवल्या. अशाप्रकारे भारतातही ब्रिटिश ड्रेस कोड लागू झाला. भारतात याबाबत कायदा करण्यात आला. वकिलांचा ड्रेस कोड ॲडव्होकेट्स ॲक्ट १९६१ अंतर्गत बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांनुसार नियंत्रित केला जातो. वकिलाला पांढरा शर्ट आणि पांढरा नेकबँड असलेला काळा कोट घालणे बंधनकारक आहे, असा नियम आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात हजर राहण्याव्यतिरिक्त वकिलांसाठी गाऊन घालणे हा एक पर्याय आहे.

'ब्लॅक कोट'चा इतिहास १३२७ मध्ये सुरू होतो जेव्हा ब्रिटिश राजा एडवर्ड तिसरा याने "रॉयल कोर्ट" मध्ये "ड्रेस कोड" लागू केला होता. त्यांनी न्यायाधीशांसाठी पोशाख तयार करण्याचे आदेश दिले. १३ व्या शतकाच्या अखेरीस, ब्रिटनमधील कायदेशीर व्यवसायातील न्यायाधीशांमध्ये ड्रेस कोडची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. त्यात अनेक श्रेणी होत्या. डोक्यावर पांढऱ्या केसांचा विग घालणारा सार्जंट सारखा. ब्रिटीश राजा एडवर्ड तिसरा (१३२७-१३७७) याच्या काळापर्यंत शाही दरबारात उपस्थित राहण्यासाठी न्यायाधीशांच्या पोशाख लागू करण्यात आला होता.