yuva MAharashtra शरद पवारांच्या भाषणावेळीच व्यासपीठावरील बॅनर कोसळले

शरद पवारांच्या भाषणावेळीच व्यासपीठावरील बॅनर कोसळले



| सांगली समाचार वृत्त |
सटाणा - दि. १७ मे २०२४
धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ येथील पाठक मैदानावर आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे भाषण सुरू असतानाच अचानक आलेल्या वादळवाऱ्यामुळे व्यासपीठावरील बॅनर कोसळले. सदर बॅनर पाठीमागच्या बाजूला कोसळल्याने सुदैवाने व्यासपीठावरील मान्यवर सुरक्षित राहिले. दरम्यान, बॅनर कोसळल्यानंतर पवार यांनी आपले भाषण आटोपते घेताना मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

सभेच्यावेळी सदर घटना घडल्याने बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. परंतु या घटनेचा कोणताही परिणाम न जाणून देता शरद पवार यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर हल्ला चढविला. पवार म्हणाले, मोफत धान्य वाटण्याची फुशारकी मारण्याचा मोदींना कुठलाही नैतिक अधिकार नाही. आम्ही राबवलेली धोरणे आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे आयातीवर निर्भर असणारा देश धनधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर होऊन निर्यातदार बनला आहे. 


शेतकऱ्यांनी स्वकष्टाने पिकवलेले अन्नधान्यच जनतेला मोफत दिले जात आहे. उलट मोदींच्या कार्यकाळात कुठल्याही शेतमालाला बाजारभाव नसून ते केवळ खोटे वक्तव्य करतात अशी टीकाही पवार यांनी केली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, प्रा. नीलेश कराळे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगरे, प्रा. यशवंत गोसावी, डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल आदींनी मनोगत व्यक्त केले.