| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १२ मे २०२४
हत्या झाल्यानंतर सुरुवातीला पुणे शहर पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात आला होता. बरोबरच दहशतवाद प्रतिबंधक विभाग (एटीएस) देखील पुणे पोलिसांसोबत तपास करत होते. या प्रकरणात पोलिसांनी जानेवारी २०१४ मध्ये मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांना त्यांनी संशयित म्हणून अटक केली. या गुन्ह्यात झालेली ही पहिलीच अटक होती. मनीष नागोरीने दाभोलकरांच्या हत्येसाठी बंदूक विकल्याचा आरोप होता.
सीबीआयने या गुन्ह्याचा तपास करावा, अशी मागणी डॉ. दाभोलकर यांच्या कुटुंबीयांनी केली होती. तसेच पोलिसांना डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांपर्यत पोचण्यात अपयश आल्याने पत्रकार केतन तिरोडकर यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) या हत्याकांडाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
मात्र, प्रकरण सीबीआयकडे सूर्पुद करावे, अशी मागणी त्यांनी आपल्या याचिकेत केली होती. सुरुवातीला झालेला तपास विशिष्ट हेतूने चुकीच्या दिशेने केला का? याची चौकशी शासनाने करावी, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने मे २०१४ मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. सीबीआयने २०१६ मध्ये सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या डॉ. वीरेंद्र तावडेला अटक केली होती.
सीबीआयने अटक करण्याआधी महाराष्ट्र पोलिसांनीही त्याला अटक केली होती. संजय साडविलकर यांनी दिलेल्या साक्षीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. वीरेंद्र तावडे या प्रकरणाचा मास्टरमाईंडपैकी एक आहे असेही सीबीआयने म्हटले होते. सोबतच सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचाही संशयित मारेकरी म्हणून शोध सुरू होताच. सप्टेंबर २०१६ मध्ये याबाबत सीबीआयने दोषारोपपत्र दाखल केले होते.
विक्रम भावे स्फोटप्रकरणातील आरोपी -
ठाण्याचा मानबिंदू असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये ४ जून २००८ ला 'आम्ही पाचपुते ' या नाट्यप्रयोगाच्यावेळी स्फोट झाला. त्यामध्ये सातजण जखमी झाले होते. या नाटकातील काही दृश्यांबाबत प्रतिगामी संघटनांनी आक्षेप घेतला होता. या स्फोटांच्या प्रकरणात विक्रम भावे याच्यासह सहाजणांना अटक करण्यात आली. त्यापैकी विक्रम भावे व रमेश गडकरी यांना न्यायालयाने दोषी ठरवले. त्या प्रकरणात त्याची जामिनावर मुक्तता झालेल्या भावे याने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी रेकी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शस्त्र हस्तगत नाही मात्र गोळीबार झाल्याचे सिद्ध होते -
आरोपी अंदुरे याने गुन्हा केल्याचा कबुली जबाब अतिरिक्त न्यायालयात दिला होता. डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींनी वापरलेले शस्त्र (पिस्तूल) हस्तगत झाले नसले, तरी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पिस्तुलातून गोळीबार झाल्याचे सांगितले आहे.
तसेच डॉ. दाभोलकरांच्या शरीरातून दोन गोळ्या बाहेर निघाल्याचे शवविच्छेदन करणारे ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे शस्त्र हस्तगत झाले नसले, तरी त्यातून गोळीबार झाल्याचे सिद्ध होते, असा युक्तिवाद ॲड. सूर्यवंशी यांनी केला होता. हा खटला 'बियाँड रिझनेबल डाउट' सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
खटला निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम
हत्येचा खटला वेळेत निकाली निघावा यासाठी न्यायालयाने कालबद्ध कार्यक्रम (टार्इम बॉण्ड प्रोग्रॉम) निश्चित केला होता. मार्च आणि एप्रिल २०२३ मध्ये या खटल्याच्या सुनावणीसाठी ठराविक तारखा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खटला लवकर निकाली निघण्यास मदत झाली. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता.
प्लॅन्चेटचा वापर -
डॉ. दाभोलकरांचे हल्लेखोर सापडत नसल्याने तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लॅन्चेटचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला होता. पत्रकार आशिष खेतान यांनी घेतलेल्या मुलाखतीत पोळ यांनी त्याची कबुली दिली होती. मात्र, त्यानंतर पोळ यांनी प्लॅन्चेट प्रकरणावरून होणारे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या प्रकरणात त्यांना क्लिनचीट मिळाली होती.