| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ मे २०२४
सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकासआघाडीमध्ये जोरदार खडाखडी झाली होती. उद्धव ठाकरेंनी ही जागा थेट घोषित केल्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी तर बंड करत सांगलीतून अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची साथही विशाल पाटलांना मिळाली, पण नंतर विश्वजीत कदम यांचं बंड थोपवण्यात महाविकासआघाडीच्या नेत्यांना यश आलं, पण विशाल पाटील मात्र त्यांच्या बंडावर ठाम राहिले.
विशाल पाटील यांच्या या भूमिकेमुळे सांगलीत तिहेरी लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीनेही विशाल पाटलांना त्यांचा पाठिंबा दिला आहे. सांगलीमध्ये भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील, शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून चंद्रहार पाटील तर विशाल पाटील अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत.
सांगलीत खेचाखेच का झाली ?
सांगलीमध्ये आदित्य ठाकरेंची सभा पार पडली आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. इंडिया आघाडीला दिल्लीत बसवण्याची आस लोकांना लागल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. सांगली मतदारसंघात खेचाखेची होणं गरजेचं होतं, त्यामुळे तीनही पक्षांची ताकद किती आहे, हे कळतं असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. राजकारणासाठी जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.
'ही सीट असेल अनेक वेगवेगळ्या सीटसाठी खेचाखेच होतेच. भाजपसोबतच्या युतीमध्ये आम्ही 25 वर्ष काढली आहेत. त्या युतीतही खेचाखेची व्हायची, ताणाताणी व्हायची, भांडणं व्हायची. एवढ्यासाठीच व्हायची, कारण दोन पक्षांना तीन पक्षांना वाटतं, उमेदवारांना वाटतं की ही सीट मी जिंकू शकतो, इकडे माझी ताकद आहे. तिथे खेचाखेच होणं गरजेचं आहे. जेव्हा खेचाखेच होते तेव्हाच आपल्याला कळतं की तीनही पक्षांची ताकद तिकडे आहे, आणि तीनही पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा महाविकासआघाडीची सीट जिंकून येते, हे 100 टक्के कळतं,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.