| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ मे २०२४
लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी उद्धव ठाकरे यांची झालेली पत्रकार परिषद आता राज्य निवडणूक आयोग तपासून पाहणार आहे. मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगांला टार्गेट केल्याची भाजपा आमदार आशिष शेलार यांनी तक्रार केली होती. त्यावर आता निवडणूक आयोगाने कारवाई सुरू केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग या संदर्भात उद्धव ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद तपासून पाहणार आहे. यात काही वादग्रस्त आढळल्यास निवडणूक आयोग यावर कारवाई करणार आहे.
मुंबईतील संथ मतदानावरून ठाकरेंची टीका
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी मतदान पार पडलं. पण त्या दिवशी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ व्यवस्थापनेमुळे मतदारांना चार-चार तास रांगेत राहावं लागलं. त्यामुळे अनेक मतदार हे मतदान न करताच घरी परतल्याचं दिसून आलं.
यावरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. तसेच हे भाजपचे कारस्थान असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मतं मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जाणूनबूजून मतदानाला वेळ लावला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता.
मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे कशी काय पत्रकार परिषद घेऊ शकतात असा सवाल करत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली असंही ते म्हणाले. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यावर कारवाई करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहे. आयोगाकडून पक्षपातीपणा करण्यात येत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. पुढे बोलताना ते म्हणाले की, मतदान केंद्रावर जाणूनबूजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातोय. मतदारांनी मतदानाला उतरवू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी सरकारचा डाव आहे, असंही ठाकरेंनी म्हटलं होतं.