yuva MAharashtra रेल्वे स्टेशन उडवून देण्याच्या धमकी मागे थेट पाकिस्तान कनेक्शन !

रेल्वे स्टेशन उडवून देण्याच्या धमकी मागे थेट पाकिस्तान कनेक्शन !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ मे २०२४
आरडीएक्सने रेल्वे स्टेशन उडवून देण्याची फोनवरून धमकी देणारा पाकिस्तानातील कसाब असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून लाहोरच्या कसाबचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी सांगली, मिरज रेल्वे स्टेशनची झाडाझडती घेतली असून आक्षेपार्ह काहीही आढळले नसले तरी या धमकीची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून कसाबविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोमवारी रात्री सांगली शहर पोलीस ठाण्यात ०८५५१८४५६६० या भ्रमणध्वनी क्रमांकावरून फोन आला होता. फोनकर्त्यांने आपण लाहोरमधून रियाज कसाब बोलत असून आपण दहशतवादी असल्याचे सांगितले, तसेच आपणासोबत पाच व्यक्ती असून आरडीएक्स आहे. सर्वजण रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब ठेवणार असल्याचे त्या व्यक्तीने फोनवरून सांगितले. या फोनची तत्काळ गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिरज व अप्पर अधीक्षक रितू खोकर यांनी सांगली रेल्वे स्टेशनची पोलीस पथक, बॉम्ब शोध पथक यांच्यामार्फत झाडाझडती घेतली. सोमवारी रात्रभर ही मोहीम सुरू होती. या वेळी रस्त्यावर असलेल्या सर्व वाहनांचीही झडती घेण्यात आली. रात्रभरच्या शोध मोहिमेनंतर ही पोकळ धमकी असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, केवळ धमकी म्हणून याकडे न पाहता या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात रियाज कसाब याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रियाजचा शोध मुंबई पोलीसही घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी सतीश शिंदे यांनी बुधवारी सांगितली.