| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ मे २०२४
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी त्यांच्या कार्यतत्पर, डॅशिंग कार्यपद्धतीमुळे समस्त महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या हृदयात आपलं खास असं स्थान निर्माण केले आहे. आज तर त्यांनी चक्क लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या टू व्हीलर वरून भर उन्हात शंभर फुटी रस्त्याच्या कामाची, तिथल्या अतिक्रमणांची पाहणी केली. काही दिवसांपूर्वी लोकहित मंचच्या वतीने या रस्त्याच्या कामाबाबत आवाज उठवत आयुक्तांनी सदर रस्त्याची समक्षपणे पाहणी करावी. अशी मागणी केली होती. त्यानुसार आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रत्यक्षपणे उपस्थित राहत इथल्या कामाची आणि परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी रस्त्याचे काम हे निकृष्ट पद्धतीने केल्याचे आढळल्याने ठेकेदारास व अतिक्रमणाबाबत अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावत सूचना केल्या. यावेळी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी वालचंद कॉलेज चौक, धामणी रोड चौक, डी मार्ट, शामराव नगर चौक, आणि कोल्हापूर रोड आदी भागातील विविध समस्या मांडल्या. यावेळी अतिक्रमणे, निकृष्ट दर्जाचे काम, विद्युत खांबांचे स्थलांतरण, याबाबत लवकरच योग्य तो धोरणात्मक निर्णय घेऊन कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.
या प्रसंगामुळे जनसामान्यांच्यात मिसळून त्यांच्या समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी तात्काळ निर्णय घेणारे अधिकारी म्हणून आयुक्त शुभम गुप्ता यांची प्रतिमा अधिकच आदरास प्राप्त झाली आहे. सांगलीच्या विकासासाठी सर्व सांगलीकर जनता अशा अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभी राहील. आवश्यक तिथे मोठ्या प्रमाणात जन सहभाग मिळेल अशी चर्चा जनसामान्यांच्या सुरू झाली आहे. एकंदरीतच नवनियुक्त आयुक्त श्री शुभम गुप्ता यांच्या कामकाजावर सांगलीकर नागरिक खुश आहेत असे चित्र दिसत आहे.