| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ मे २०२४
हातकणंगले येथील महिलेचा गर्भपात करताना कर्नाटकमध्ये मृत्यू झाला. यावेळी तेथील प्रशासनाने मृतदेशाचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह हा सांगलीमध्ये आणला. सांगली पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच, हा गुन्हा बेळगावच्या चिकोडी पोलीस ठाण्याकडे वर्ग केलेला आहे. संबंधित महिलेचे माहेर हे मिरज तालुक्यातील आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा चिकोडी पोलीस करत असून हा सगळा प्रकार कसा घडला हे कळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैन्य दलात असलेल्या जवानाच्या पत्नीची तिच्या नातेवाईकांनी गर्भलिंग चाचणी केली. यानंतर गर्भपात करण्यासाठी तिला चिकाेडीमधील महालिंगपूर येथील एका दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक झाली. याच दवाखान्यात तिचा मृत्यू झाला. पण त्या ठिकाणी तिचे मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यास दवाखान्याने नकार दिला. त्यामुळे नातेवाईकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला. यानंतर तिचा मृतदेह हा सांगलीमध्ये घेऊन जाण्याचे ठरले. सांगलीमध्ये मृत्यूचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तिच्या नातेवाईकांचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी मिरज तालुक्यातील एका डॉक्टरची त्यांनी मदत घेतली.
या संपूर्ण घटनेची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांना समजली. त्यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे गौतम कांबळे, मछिंद्र बर्डे आणि सुमित सूर्यवंशी यांना माहिती दिली. पोलीस पथकाला सांगली बसस्थानक परिसरात एक गाडी दिसली. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने गाडीची पाहणी करण्यात आली. यावेळी महिलेच्या मृतदेहासह दोनजण बसलेले आढळले. चौकशी केल्यानंतर त्यांनी घडलेली घटना सांगितली. ही घटना ऐकून पोलिसांनासुद्धा धक्का बसला. पोलिस त्या महिलेचा मृतदेह हा शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर आता हे प्रकरण चिकोडी पोलिस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे आता चिकोडी पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.