| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ मे २०२४
लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत चार टप्प्यात मतदान पार पडलं आहे. पाचव्या टप्प्यासाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे. सहाव्या आणि सातव्या टप्प्यानंतर ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यंदाची निवडणूक खूपच अटीतटीची होण्याची शक्यता आहे. कारण, एनडीएला कडवी झुंज देण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची मोट बांधली आहे. सध्या दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे.
जुमला पर्व संपतंय,
दरम्यान, इंडिया आघाडीने मुंबईत आज शनिवारी जाहीर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकारपरिषदेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.
देशात इंडिया सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? तशी तुमची इच्छा आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विचारला. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही इंडिया आघाडीची स्थापना देशातील लोकशाही आणि स्वातंत्र टिकवून ठेवण्यासाठी केली आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
"गंमतीची गोष्ट अशी आहे की, आमच्या इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत. आम्ही वर्षाला एक पंतप्रधान करू शकतो, असं नरेंद्र मोदी म्हणतात. याचा अर्थ त्यांनी मानलेलं आहे की, भाजपचं सरकार येत नाही. आमच्याकडे चेहरा कोण हा प्रश्नच नाही. प्रश्न आहे तो भाजपकडे कारण त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा एकच चेहरा आहे", असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहे. त्याबद्दल आमचं ठरलेलं आहे. आधी त्यांना (भाजपला) अंगावर यायचं तर येऊ द्या. भाजपकडे पंतप्रधान पदाचा आता चेहरा नाही. अनेकदा मोदीजीच म्हणाले, की एकच प्रोडक्ट किती वेळा लाँच करणार. आता माझाही त्यांना तोच प्रश्न आहे. प्रत्येक वेळी निवडणूक आली की मोदीच बोहल्यावर चढतात", असा टोलाही उद्धव ठाकरेंनी हाणला.