| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ६ मे २०२४
भाजपचे जवळपास ४० मित्रपक्ष काही राज्यांत डोकेदुखी ठरत आहेत. कारण, या निवडणुकीत ते १०० जागांवर निवडणूक लढत आहेत. मात्र, त्यांची कामगिरी समाधानकारक नाही. मित्रपक्षांमुळे ४०० जागांवर विजय मिळविण्याची चिंता वाढली असून 'अब की बार ४०० पार'ची घोषणा भाजपला बाजूला ठेवावी लागत आहे.
बिहारमध्ये भाजपचे मित्रपक्ष ४० पैकी २३ जागा लढवित आहेत; पण ते एकत्रितपणे प्रचार करू शकत नाहीत. कारण, एलजेपीचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनी २०२०च्या विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांना माफ केलेले नाही. चिराग पासवान यांचा पक्ष पाच जागा लढवत आहे. आरएलएम आणि हम यांच्यापुढेही आव्हान आहे. जदयूही लढत असलेल्या १६ जागा जिंकू शकत नाही.
कर्नाटकात सेक्स स्कॅण्डल उघडकीस आल्यानंतर एच. डी. देवेगौडा यांचा जनता दल (एस) हा पक्ष भाजपसाठी अडचण ठरला आहे. त्यामुळे २०१९ मध्ये जिंकलेल्या २५ जागा जिंकणे कठीण आहे. उत्तर प्रदेशात भाजपने त्यांच्या मित्रपक्षांना (अपना दल-२, आरएलडी-२, एसबीएसपी-१ आणि निषाद-१) अशा सहा जागा दिल्या आहेत आणि २०१९च्या ६४ जागांची संख्या सुधारण्याची आशा आहे.
केरळात खाते उघडण्याची आशा
आंध्र प्रदेश हे कदाचित एकमेव राज्य आहे, जिथे भाजप चांगली कामगिरी करेल आणि लोकसभेच्या २५ पैकी बहुतांश जागा जिंकू शकेल. कारण, युतीतील सहकारी पक्ष एकत्र काम करत आहेत.
सहा जागा लढत असलेला भाजप चांगली कामगिरी करत आहे. तामिळनाडू आणि केरळात भाजप खाते उघडेल, असे वाटते.
कारण, आठ छोट्या पक्षांसह येथे भाजप लढत आहे. झारखंडमध्ये २०१९ प्रमाणेच मित्रपक्ष एजेएसयूला एक जागा दिली आहे. पूर्वोत्तरमध्येही सात ते आठ मित्रपक्षांसोबत भाजप निवडणूक लढत आहे.
महाराष्ट्रात ४१ जागा जिंकणे कठीण
सर्वात जास्त काळजी महाराष्ट्रात आहे. २०१९ मध्ये जिंकलेल्या ४८ पैकी ४१ जागा यंदा कोणत्याही सर्वेक्षणातून 'एनडीए'ला मिळताना दिसत नाहीत.
शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हेही लढत असलेल्या १९ जागांवर फारशी चांगली कामगिरी करण्याची शक्यता नाही. मात्र, भाजपची कामगिरी चांगली राहील, असे सांगितले जात आहे.