yuva MAharashtra कोट्यवधींच्या चलनी नोटा घेऊन जाणारे चार कंटेनर आंध्र प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात !

कोट्यवधींच्या चलनी नोटा घेऊन जाणारे चार कंटेनर आंध्र प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात !



| सांगली समाचार वृत्त |
त्रिवेंद्रम - दि. ३ मे २०२४
कोट्यवधी रुपयांच्या चलनी नोटा घेऊन जाणारे चार कंटेनर आंध्र प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच मोठी खळबळ उडाली होती. सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडूनही देशभरात मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करून तपासणीचे काम सुरू आहे. अशातच या कंटेनरमध्ये कोट्यवधी रुपये आढळल्याने खळबळ उडाली होती. परंतु, अधिक चौकशी केली असता हे कंटेनर बँकांचे असल्याचे समोर आले. त्यानंतर हे कंटेनर सोडून देण्यात आले.

गुरुवारी रात्री २ हजार कोटी रुपयांच्या मळलेल्या चलनी नोटा घेऊन जाणारे चार कंटेनर ट्रक आंध्र प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु, नंतर ते बँकांचे असल्याने समोर आल्यानंतर सोडून देण्यात आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर हे नोटांनी भरलेले ट्रक सोडण्यात आले आणि या चलनी नोटा ICICI, IDBI आणि फेडरल बँकेच्या असल्याचे, अनंतपूर रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक आर एन अम्मी रेड्डी यांनी सांगितले. केरळहून आलेले हे ट्रक हैदराबादमधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) प्रादेशिक कार्यालयाकडे जात होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असल्याने पोलिसांनी हे ट्रक ताब्यात घेतले. आंध्र प्रदेशात संसदीय आणि विधानसभा निवडणुकांसाठी एकाच वेळी १३ मे रोजी मतदान होणार आहे. या ट्रकसोबत काही वाहने होती त्यामध्ये या नोटा घेऊन जाण्यासाठी लागणारी सर्व आवश्यक ट्रान्झिट कागदपत्रे होती.

दरम्यान, या नोटा त्यांच्याच असल्याची खात्री करण्यासाठी संबंधित बँका आणि आरबीआयकडे पडताळणी करण्यात आल्यानंतर त्या सोडण्यात आल्या. यावेळी आयकर विभागाचे अधिकारी, निवडणूक रिटर्निंग अधिकारी आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पडताळणी प्रक्रियेत सहभागी करण्यात आले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. रेड्डी म्हणाले की, या चलनी नोटा केरळहून हैदराबातमध्ये आणल्या जात आहेत, याची कोणतीही माहिती आंध्र प्रदेश पोलिसांना देण्यात आली नव्हती. या चार ट्रकमधील मळलेल्या नोटा आयसीआयसीआय, आयडीबीआय आणि फेडरल बँक यांच्या मालकीच्या होत्या आणि त्याची रक्कम २ हजार कोटी रुपये होती. त्या कोचीहून आरबीआय, हैदराबाद येथे नेल्या जात होत्या, असे रेड्डी यांनी सांगितले.