| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० मे २०२४
धक्कातंत्र देत महाराष्ट्रातल्या लोकांना अचंबित करणाऱ्या नेत्यांमधील प्रमुख नेते असलेल्या अजित पवार यांच्या हालचालींविषयी गेल्या काही दिवसांपासून गूढ निर्माण झाले होते. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीच्या झालेल्या सभेत अखेरच्या क्षणी ते व्यासपीठावर अवतीर्ण झाले. मात्र, त्यानंतरी त्यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरूच आहे. अचानक नॉट रिचेबल झाल्यामुळेही अजित पवार चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांत प्रचारादरम्यान, काही उमेदवारांना थेट धमक्या दिल्याने ते टीकेचे धनी बनले होते. मात्र, गेल्या ५-७ दिवसांपासून अजित पवार निवडणूक प्रचारातही सहभागी नसल्याचे दिसून आले.
मोदी यांनी 15 तारखेला घाटकोपर येथे 'रोड शो ' केला. दिंडोरी, धुळे आणि नाशिक मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी बुधवारी नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत होते. नगर येथे १० तारखेला झालेल्या सुजय विखे पाटील यांच्या प्रचारानंतर पवार सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर आहेत. शुक्रवारी मोदी यांच्या मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या रॅलीतही ते दिसले नाहीत.
मोदी यांनी १४ मे रोजी वाराणसीतून महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत निवडणूक अर्ज भरला तेव्हाही पवार गैरहजर होते. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल वाराणसीत पोहोचले होते. त्यामुळे, अजित पवार नेमकं कुठे गायब झाले आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर, अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन झाल्याने, तब्बेत बरी नसल्याने गैरहजर राहिल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात येत आहे. मात्र, अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भारतीय जनता पक्षाशी राष्ट्रवादी काँग्रेसची मोट बांधून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री धुरा खांद्यावर घेतली. त्यानंतर त्याच्याविषयी अनेक नकारात्मक गोष्टी त्यांचे पूर्वाश्रमाचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी जाहीरपणे बोलून दाखवली.
बारामती मतदारसंघांमध्ये अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना आपली चुलत बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे करून जोरदार आवाहन उभे केले होते. निवडणूक प्रचार दरम्यान नरेंद्र मोदी यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा केल्यानंतर स्वतः अजित पवार निराश झाले आणि त्यांनी बारामतीतील आपल्या प्रचार फलकांवरून मोदींची छबी तातडीने हटवली.
गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मतदान झाल्यानंतर अजित पवार यांच्या भुमिकेविषयी प्रश्नचिन्ह असून अजित पवार नरेंद्र मोदी यांच्या सभेपासून पुन्हा एकदा दूर राहिल्याचे सलग उदाहरण समोर आले आहे.
पवार यांच्या या भूमिकेमुळे एकूणच महायुतीतील पक्षांमध्ये अस्वस्थता असून अजित पवार नेमके कोठे होते, खरेच आजारी होते किंवा कसे याविषयी आठवडाभर संबंधितांमध्ये उलटसुलट विचार सुरू होते. त्यांच्या एका निकटवर्तीयाने अजित पवार पावसात भिजल्याने आजारी होते, असा दावा शनिवारी केला.