| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ मे २०२४
लोकसभेच्या पहिल्या दोन टप्प्यांत अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने भाजपने मतदान वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यानंतर पुढे मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी भाजपने नेत्यांना सूचना केल्या आहेत. कमी मतदान झाल्यास नेत्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांना कारवाईस तयार राहण्यासही सांगितले आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात कमी मतदान झाल्यामुळे भाजपची काळजी वाढली आहे. पहिल्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात अधिक मतदान झाले आहे. मात्र, भाजपच्या अंदाजानुसार तेही कमी आहे. गेल्या तीन दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वत: राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून सूचना देत आहेत. मंगळवारच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी शाह यांनी लोकसभा प्रभारी, प्रदेश प्रभारी आणि संघटनांच्या नेत्यांना सर्व जागांवर मतदान वाढविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सर्व राष्ट्रीय सरचिटणीसही मतदानावर लक्ष ठेवून आहेत.
लाभार्थ्यांचे १०० टक्के मतदान झालेच पाहिजे
वाढत्या आणि कडक उन्हात तसेही मतदान कमी होते. मात्र, प्रत्येक मतदान केंद्रावर पूर्वीपेक्षा ३७० अधिक मते कशी पडतील, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. केंद्रीय योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचे १००% मतदान झाले पाहिजे, असा प्रयत्न आहे. मग ती मोफत रेशन योजना असो की, प्रधानमंत्री आवास योजना, लाभार्थ्यांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी भाजपची टीम कार्यरत आहे.
राज्यात दिवसभर बैठका
राज्यात मंगळवारी झालेल्या निवडणुकीत मतदानाचा टक्का कोणत्याही परिस्थितीत वाढवा, असे निर्देश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेऊन दिले होते.
एका मतदारसंघातील १ हजार बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आणि सुपर वॉरियर या ऑनलाईन बैठकांना उपस्थित होते. पक्षाचे महाविजय २०२४ चे उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर मतदान मोठ्या प्रमाणात झालेच पाहिजे, यासाठी कुठलीही कसर सोडू नका असे बावनकुळे यांनी सांगितले.