| सांगली समाचार वृत्त |
धाराशिव - दि. ६ मे २०२४
तकरी बळीराजाचा नाद नाही करायचा हे काही उगी नाही. मनात आल्यावर थेट चारचाकी गाड्यांच्या शोरूम मध्ये जाऊन गाडी घेणे. नवरदेव नवरीसाठी लग्नात हेलिकॉप्टर आणणे. अशी अनेक उदाहरणे शेतकरी काहीही करू शकतो याचे आपल्या समोर आहेत. यात आता अजून एक नाव समाविष्ट झाले आहे ते म्हणजे धाराशीव (अहमदनगर) जिल्ह्यातील गोदावरी तिरी वसलेल्या कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी येथील शेतकरी गोरक्षनाथ जालिंदर पुरी.
कांदा, मका, सोयाबीन अशी पारंपरिक पिके घेणारे गोरक्षनाथ पुरी तर गावच्या ग्रामपंचायत सदस्या असलेल्या रंजना ताई पुरी यांनी आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नाला शेतात मंडप उभारला. सोबत या मंडपाच्या आजूबाजूला हिरवळीचे खत असलेल्या तागाचे गार्डन निर्माण केले. तागाचा हा प्रयोग दि. २९ एप्रिल रोजी लग्नाला उपस्थित वर्हाडी मंडळीसह सध्या या फोटोमुळे सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय.
मंडप मालकाच्या सहकार्याने एक महिना आधी रांगोळी टाकून आखणी केली. मंडप उभारताना त्याचे खांब अडथळा करणार आहे याची काळजी देखील घेतली गेली. फावड्याच्या मदतीने दांड तयार करून त्यात पुरी दांपत्याने तागाची लागवड केली. नियमित पाटपाणी दिले. ज्यातून लग्नाच्या दिवशी एक सुंदर अप्रतिम असे गार्डन वर्हाडी मंडळीच्या स्वागताला मंडपाच्या आजूबाजूने निर्माण झाले. यासाठी चक्क त्यांनी १८ किलो तागाचे बी १०० रुपये किलो प्रमाणे खरेदी केले होते.
शेतकरी तरुणांस दिली कन्या
मुलगा शेतकरी असेल तर लग्नाला मुलगी मिळत नाही. अशी सभोतालची परिस्थिती असताना देखील गोरक्षणाथ पुरी यांनी आपल्या पदवीधर कु. पुनम या लेकीचे लग्न नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या पिंप्री येथील एका शेतकरी तरूणाशी जमविल्याने याचे देखील परिसरात विशेष कौतुक होत आहे.
उच्च शिक्षित असून शेतात राबणारी लेक
पुरी यांची कन्या पुनम ही कोपरगाव येथील एका महाविद्यालयातून बी ए पदवीधर आहे. अभ्यासात हुशार असलेली उच्च शिक्षित पुनम शेतातील कामांत ही अतिशय कष्टाची आहे. शेतीची आणि मातीची तिला जाण आहे. असे अभिमानाने गोरक्षनाथ पुरी सांगतात.
हिरवळीचे खत म्हणून ताग उपयोगी
ताग पिकवून तो शेतात गाडल्याने त्याचे खूप फायदे आहे. गोरक्षनाथ पुरी हे सांगतात की, आता हा ताग शेतात गाडण्यात येणार असून यामुळे पुढच्या हंगमात पीक देखील चांगले मिळणार आहे. तसेच इतर शेतकरी बांधवांनी देखील हिरवळीचे खत म्हणून तागाची लागवड करावी.