| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ मे २०२४
एकदा देशावर इंडिया आघाडीची सत्ता आली की आम्ही अयोध्येतील राम मंदिराचे शुद्धीकरण करणार, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राम मंदिरातील पूजा अधर्माच्या आधारावर करण्यात आली. त्यामुळे तेथे शुद्धीकरण केले जाईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.
पटोलेंनी सांगितले की, मोदींनी नगरमध्ये असे म्हटले होते की, काँग्रेसची सत्ता आली तर ते मी आणलेल्या योजना काढून घेतील. राम मंदिरही त्यात आलं. पण भाजपवाले गहू, तांदूळ देतात ती योजना आमचीच आहे. आम्ही काही ती बंद करणार नाहीत. गरिबांना आम्ही प्लास्टिकचे तांदूळ देणार नाही. योग्य प्रमाणात अन्नधान्य आणि साखर देणार. आम्ही सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचं शुद्धीकरण करणार आहोत. कारण आमच्या सनातन धर्माच्या चार शंकराचार्यांनी या विधीला विरोध केला होता. त्यामुळे चार शंकराचार्यांना आम्ही बोलावू आणि राम मंदिराचं शुद्धीकरण करून घेऊ. तसंच त्या मंदिरात आम्ही राम दरबार स्थापन करू. कारण आता त्या मंदिरात राम दरबार नाही. मूळ जी मूर्ती बाजूला सारण्यात आली आहे
त्यामुळे आम्ही रामलल्लांचा दरबार मंदिरात सजवू. तसंच शंकराचार्यांच्या हस्ते आम्ही मंदिराचं शुद्धीकरण करू. कारण त्यांचंच हे म्हणणं आहे की, जो विधी झाला तो धर्माला धरून झाला नाही. आम्ही सुधारणा करू. धर्माच्या आधारावर सुधारणा करू, अधर्माच्या नाही. नरेंद्र मोदींनी केलं ते अधर्माच्या आधारावर केलं असाही टोलाही पटोलेंनी लगावला.