| सांगली समाचार वृत्त |
जयसिंगपूर - दि. ८ मे २०२४
दिनांक 08 मे 2024 रोजी डॉ.मनोहर बाबुराव कचरे यांच्या मातोश्री श्रीमती जयवंती बाबुराव कचरे (वय 70 वर्षे ) यांचे निधन झाले .
डॉ.मनोहर कचरे यांनी आईचे नेत्रदान तसेच त्वचा दान करण्याबाबतचा मनोदय डॉ.स्मिता चौधरी यांना बोलून दाखवला. प्रतिज्ञा फॉर्म आधी भरला नसेल तर नेत्रदान तसेच त्वचा दान करता येणार नाही या कल्पनेने ते नाराज झाले होते. परंतु डॉक्टर स्मिता चौधरी यांनी दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनच्या सांगली जिल्हा को-ऑर्डिनेटर डॉ.हेमा चौधरी यांना फोन केला. प्लेज फॉर्म म्हणजेच प्रतिज्ञा पत्र जरी एखाद्या व्यक्तीने जिवंत असताना भरलेले नसले आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांची त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दान करण्याची तयारी असेल तरीसुद्धा नेत्रदान, त्वचा दान करता येते हे डॉ.हेमा चौधरी यांनी त्यांना समजावून सांगितले आणि त्यांच्या समन्वयाने नेत्रदान, त्वचा दान सफल घडवून आणले.
नंदादीप आय हॉस्पिटल यांनी नेत्रदान स्वीकारले. तसेच त्वचा दान रोटरी स्किन बँक, सांगली यांनी स्वीकारले. हे महादान घडवून आणण्यासाठी जयवंती बाबुराव कचरे यांचे पुत्र डॉ.मनोहर बाबुराव कचरे यांचे अशा दुःखद प्रसंगी प्रासंगिक धारिष्ट महत्त्वाचे ठरले. आईच्या निधनाचा अचानक झालेला दुःखाचा डोंगर सावरून अवयव दानाचा विचार करणाऱ्या डॉक्टर मनोहर कचरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महादानी जयवंती कचरे यांच्या आत्म्यास शांती आणि संपूर्ण कुटुंबीयांना परमेश्वर आशीर्वाद देवो,
अशी प्रार्थना करूया. अत्यंत दुःखाच्या क्षणी असा निर्णय घेणे हे धीराचे काम आहे. समाजाने अशा कुटुंबियांचा विशेष आदर करणे, हे जागृत समाजाचे कर्तव्य आहे असे मी मानते.
- डॉक्टर हेमा चौधरी,
दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ,सांगली जिल्हा कोऑर्डिनेटर