yuva MAharashtra प्रचारात सोशल मीडिया अव्वल

प्रचारात सोशल मीडिया अव्वल



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ मे २०२४
उन्हाचा वाढता ताप, थेट मतदारापर्यंत 'रीच', तुलनेने स्वस्त आणि प्रभावी माध्यम म्हणून निवडणुकीत सोशल मीडिया 'अव्वलस्थानी' राहिले. त्यामुळे राजकीय पक्षांच्या सोशल मीडिया हॅंडल्सबरोबरच जास्त फॉलोअर्स असलेल्या इन्फ्ल्यूएन्सर्सला चांगले दिवस आले आहेत. निवडणूक म्हटले की गावोगावी फिरणारी प्रचाराची वाहने, घरापर्यंत मत मागायला येणारे कार्यकर्ते, चौकाचौकांत होणाऱ्या सभा आणि रस्त्यांवर रॅलीचा धुरळा, असे काहीसे स्वरूप असायचे. 

पण यंदा प्रचारदूत म्हणून सोशल मीडिया अव्वल असून, लोकांची मते बनविण्यासाठी त्याचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. पक्षांचे जाहीरनामे मतदारांपर्यंत पोहचविण्यापासून ते विरोधी नेत्यांचे वक्तव्य खोडण्यापर्यंत सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मतदानाच्या दिवशी 'हवा' फिरविण्यासाठी देखील याचा वापर होत आहे.

वॉर रूम : नेते किंवा पक्षाच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी भरलेल्या कार्यालयांबरोबरच आता सोशल मीडियाची वॉर रूमही करण्यात आली आहेत. ज्याद्वारे प्रचाराला इव्हेंटचे स्वरूप देत नेत्यांचे व्हिडिओ, फोटो, संदेश तयार करण्यात येत आहेत. ट्रेंडिंगमध्ये काय आहे, आपला कंटेंट काय असावा अशा स्ट्रॅटेजीने सध्या वॉर रूमचे वातावरण तापत आहे. जसे मतदान जवळ येत आहे, तसे 'सोशल' वॉर वाढत आहे.

माध्यम साक्षरता गरजेची

परंतु अर्धसत्य किंवा खोटी माहिती दिल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहेत. राजकीय विचारधारांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर हेतुपुरस्सर खोटी माहिती पसरवली जात असून, त्यातून नेमके खरे काय आहे? याचा शोध मतदारांना घ्यावा लागणार आहे. येत्या काळात हे आव्हान वाढणार असून, माध्यम साक्षरतेची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मीम्सचा वापर...

उमेदवाराचे किंवा नेत्यांचे जुने व्हिडिओ काढून मीम्सच्या स्वरूपात फिरविले जात आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये सोशल मीडिया पोस्टचे वॉर सुरू आहेत तर दुसरीकडे यूट्यूब चॅनल्सकडून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात असून, अधिकृतपणे सोशल मीडिया कंटेंटही विकसित करण्यात येत आहे. ज्याचे फॉलोअर्स जास्त, त्याला या ट्रेंडिंगच्या जमान्यात जरा जास्त भाव आहे.

आजचा युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर करतो. त्यामुळे राजकीय पक्षांनाही याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. सोशल मीडियाचा प्रचारासाठी वापर वाढला आहे. सोशल मीडियावरील माहिती योग्य की अयोग्य? हे पडताळण्यासाठी माध्यम साक्षरतेची गरज आहे.