| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २५ मे २०२४
शालेय प्राथमिक अभ्यासक्रमाच्या आराखड्यात मनुस्मृतीचा उल्लेख असल्याच्या चर्चेने राजकीय वादंग निर्माण झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज पत्रकार परिषदेदरम्यान याबाबतचा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी यासंबंधी राज्य सरकारकडे भूमिका मांडली पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे, भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हे आरोप निराधार असल्याचं सांगितलं आहे.
अभ्यासक्रमातील मनुस्मृतीच्या उल्लेखासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "ही बाब माझ्याही वाचनात आली. ज्या दोन-तीन गोष्टी आहेत त्यामध्ये मनुस्मृतीचाही उल्लेख आहे. या गोष्टीबाबत शैक्षणिक क्षेत्रातील जे जाणकार आहेत, त्यांनी विचार करावा आणि यासंबंधीची आग्रही भूमिका सरकारसमोर घेतली पाहिजे. मात्र त्यांनी ती भूमिका घेतली नाही तर प्रागतिक विचारांच्या अनेक संस्था आहेत, त्या गप्प बसणार नाहीत," असा अप्रत्यक्ष इशारा पवार यांनी दिला आहे.
मनुस्मृतीबाबत होत असलेल्या आरोपांचा देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक शब्दांत समाचार घेतला. "मी असल्या फालतू आरोपांना उत्तरं देत नाही. अलीकडच्या काळात आरोप करणाऱ्यांना काही उद्योग उरले नाहीत. वाटेल ते आरोप केले जात आहेत. महाराष्ट्रात वर्षानुवर्ष मनाचे श्लोक बोलले जातात, ऐकले जातात. मात्र त्या गोष्टी अभ्यासक्रमात आहेत की नाही, हे मी तपासले नाही. परंतु विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय, तो योग्य नाही," असं फडणवीस म्हणाले.