| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ मे २०२४
"महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. 20 तारखेला शेवट होत आहे. मुंबईच्या निवडणूका शेवटच्या टप्प्यात आहेत. खूषखबर देतोय, पहिल्या चार टप्प्यात महा विकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे. अभूतपूर्व विजयाकडे आपली वाटचाल सुरु आहे", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कुर्ला येथे महायुतीची सभा पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.
नागरिकांवर असलेला भुर्दंड आपण माफ केला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2014 नंतर मुंबईत काम करण्याची संधी आपल्याला मिळाली. म्हाडाच्या 56 वसाहतींमध्ये आपण सेवाशुल्क माफ केला. 380 कोटी रुपयांचा नागरिकांवर असलेला भुर्दंड आपण माफ केला. या वसाहतींच्या पुनर्विकासात सुलभता आणली. जे अडथळे होते ते दूर केले. खासगी विकासकांमुळे विकास रखडला होता. जिथे आवश्यक असेल तिथे म्हाडा विकास करेल, सोबत विक्री हस्तांतरण यासंदर्भात अनेक निर्णय आपण घेतले.
2014 नंतर मेट्रो सेवा सुरु केली, कोस्टल रोड, अटल सेतू केला
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सामान्य मुंबईकरांना घर मिळाले पाहिजे, हे आपले ध्येय आहे. 25 वर्षे राज्य केल्यानंतर सर्वसामान्य माणसाला घर का दिले नाही? हा माझा प्रश्न आहे. त्याच्या जीवनात बदल का केला नाही? आम्ही 14 हजार सेस इमारतींचा मार्ग मार्गी लावला. लोकांना स्वतः चे घर मिळेल, अशी व्यवस्था निर्माण केली आहे. 2014 मध्ये देशात व राज्यात युतीचे राज्य आले. आधी मला आणि आता एकनाथ शिंदे यांना तुम्ही संधी दिली. बदलणारी मुंबई आपण पाहतोय. 2014 नंतर मेट्रो सेवा सुरु केली. कोस्टल रोड, अटल सेतू केला. सांडपाणी प्रक्रियासाठी 25 हजार कोटींच्या प्लांटचे काम केले.
आज काँग्रेसचे लोक बोलतात की, कसाबने करकरे यांना मारले नाही. त्यांना कसाबच्या बदनामीची भीती आहे. ज्यावेळी शिक्षा झाली. त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. अरे नालायकांनो राजकारण करायचे तर करा. पण शहिदांचे राजकारण करू नका. आज काँग्रेसचा पंजा कसाबसोबत तर महायुती उज्ज्वल निकम यांच्यासोबत आहे. कुर्ला असेल किंवा उत्तर मध्य असेल परीक्षा उज्ज्वल निकम नाही तर तुमची आहे, असंही फडणवीस म्हणाले.