| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २ मे २०२४
जगातली दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला आणि भारताचा शेजारी चीन हा देश नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कुरापती काढण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या देशातले काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सोमवारी (29 एप्रिल) सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये 'फुजियान' नावाचं सुपरकॅरियर जहाज सुरुवातीच्या सागरी चाचण्यांसाठी निघाल्याचं दिसत आहे. चीमधल्या यांगत्से नदीच्या त्रिभुज प्रदेशातल्या चांगक्सिंग बेटावरच्या जिआंगनानमधल्या बंदरातून हे जहाज पाण्यात उतरलं आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फुजियान ही चीनची तिसरी विमानवाहू युद्धनौका आहे. तिची संपूर्ण बांधणी चीनमध्येच झाली आहे. ही चीनची आतापर्यंतची सर्वांत मोठी युद्धनौका आहे. तिचं वजन सुमारे 80 हजार टन असल्याचं म्हटलं जात आहे. फुजियानच्या माध्यमातून आपलं सशस्त्र दल आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न चीन करत आहे. 21व्या शतकाच्या मध्यापर्यंत पीपल्स लिबरेशन आर्मीचं (पीएलए) जागतिक दर्जाच्या सैन्यामध्ये रूपांतर करण्याचा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा मानस आहे. त्यानुसार चीन पावलं उचलत आहे.
तज्ज्ञांच्या मते, फुजियानची चाचणी यशस्वी झाली आणि ती चिनी नौदलात दाखल झाली तर चीन आणि अमेरिकेतला लष्करी फरक कमी होईल. विशेषत: तैवानबाबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फुजियान महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. विमानवाहू युद्धनौकांच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.
फुजियानची वैशिष्ट्यं
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फुजियानमधली रडार यंत्रणा आयताकृती आहे. त्याच्या मदतीने लांब अंतरावरून येणारी क्षेपणास्त्रं आणि लढाऊ विमानं शोधता येतील. स्व-संरक्षण शस्त्रांसाठी HQ-10 शॉर्ट-रेंज, कमी अंतरावरच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीसाठी त्यावर लाँचर फिट केले आहेत. H/PJ-11 30 मिलीमीटर ऑटोकॅनन्सचादेखील यात समावेश आहे.
फुजियानवर कोणती विमानं तैनात केली जातील याबाबत अद्याप कोणतीही माहिती उघड झालेली नाही. असं मानलं जातं आहे, की या युद्धनौकेवर J-15B लढाऊ विमानं तैनात केली जातील. याशिवाय J-35 देखील त्यावर तैनात केलं जाऊ शकतं. J-15D प्रकारची इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर फायटर जेटदेखील त्यावर ठेवली जाऊ शकतात.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, फुजियानला दीर्घ कालावधीच्या चाचणीतून जावं लागेल. शेंडोंग ही पूर्वीची विमानवाहू युद्धनौका मे 2018 मध्ये तिच्या पहिल्या समुद्री चाचणीसाठी पाण्यात उतरली होती. त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये ती कार्यान्वित झाली होती. फुजियानला यापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.