| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २३ मे २०२४
'महापालिकेच्या वतीने सांगली, मिरज आणि कुपवाड येथील शहर वाहतुकीसाठी इ-बसेस चालू करणार असून त्या बसेससाठी मिरज येथे आगार (डेपो) चालू करणार आहोत. यामध्ये इलेक्ट्रीक बसेससाठी चार्जिंग पॉईंट आणि इतर सुविधा देण्यात येणार आहेत. शहरातील सांगलीकर मळा, अग्नीशमनदल येथे महापालिकेच्या मालकीची जागा देण्यात येईल. इ-बसेस चालू करण्याचा प्रस्ताव सिद्ध करून तो शासनाला पाठवला आहे. महापालिका आणि राज्य परिवहन मंडळाची बससेवा चालू राहील', अशी माहिती महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी २२ मे या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मिरज शहरातील पत्रकारांच्या वतीने शुभम गुप्ता यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना आयुक्त शुभम गुप्ता यांनी शहर विकासाबाबत खालील मुद्दे मांडले.
१. मिरज शहरातील समस्यांची संख्या अधिक असल्याने त्या सर्व समस्या टप्प्याटप्याने सोडवू. शहरातील नादुरुस्त, सिग्नल, भाजी मंडई, वाहनतळ आदी प्रश्न सोडवले जातील. शिवाजी स्टेडियमविषयी आलेल्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. पावसाळ्याच्या अनुषंगाने उपाययोजनांच्या दृष्टीने माहिती घेण्यात आली आहे.
२. आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासमोर पत्रकारांनी मिरज येथील समस्यांचा पाढाच वाचल्यानंतर प्रत्येक समस्यांची माहिती घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
३. आठवड्यातून एकदा मिरज येथे येऊन कामकाज केले जाईल. ३ दिवसांपूर्वी मी एक स्थायी आदेश काढला होता, त्यानुसार मिरज येथील महापालिकेच्या कार्यालयात आठवड्यातून २ दिवस येऊन उत्तरदायीपणाने काम करण्यासाठी २ अधिकार्यांना पाठवण्यात आले आहे. हे अधिकारी लोकांच्या समस्या सोडवतील. ज्या समस्या सुटण्यात अडचणी येतील, तर मी सांगली येथे बसून प्रश्न सोडवीन. महापालिका क्षेत्रातील बांधकाम, पाणीपुरवठा, जलनिःस्सारण आदी विभागांतील प्रलंबित कामांची सूची सिद्ध करून ती कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
४. अतिरिक्त आयुक्तांनाही विषय वाटप करून दिलेला आहे. तेही आढावा घेण्यास प्रारंभ करत आहेत. जलनिःस्सारणाची अपूर्ण कामे ठेकेदारांनीच पूर्ण करायची आहेत. शहरातील अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करू.
५. मिरज येथील भौगोलिक परिस्थितीत पूर्वीपासूनची अतिक्रमणे आहेत. याचा लोकांना अधिक त्रास होत आहे. हे पालटण्यासाठी प्रयत्न करू. शासनाकडे डीपीचा अंतिम नकाशा मान्य झालेला नाही. कोणत्या रस्त्यांचे रुंदीकरण करायचे आहे, ते पाहिले जाईल.
६. महापालिकेतील कर्मचार्यांची नवीन भरती करण्यास मान्यता मिळाली आहे. १ महिन्यात कर्मचार्यांची भरती करण्यात येईल. मिरज शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह होण्यासाठी प्रयत्न करू.
७. मिरज येथील भाजीमंडईविषयी पालकमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. भाजी मंडईचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी महापालिका क्षेत्रातील अतीधाेकादायक इमारती पाडण्यासाठी संबंधित ३७ लोकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यांनी ३ दिवसांत स्वतःहून इमारती न पाडल्यास महापालिकेच्या वतीने पाडण्यात येतील.