yuva MAharashtra बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ मे २०२४
अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबत नेमकं काय ठरलं होतं, याबाबत उद्धव ठाकरे विविध मुलाखतीत दावे करत आहेत. त्यावरच देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिदावा केला आहे. 

मी युटर्न का घेतोय, शिवसैनिकांना काहीतरी मिळालंय असं दाखवायला हवं असं उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं होतं. पत्रकार परिषदेत काय बोलायचं हे मातोश्रीवरच ठरलं होते असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत किंवा ते खोटे बोलतात, नाहीतर दोन्ही करतात अशी मला शंका आहे. कारण उद्धव ठाकरे आणि मी युतीच्या बोलणी करताना सगळी चर्चा झाल्यानंतर आम्हाला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद हवं असं ते बोलले. त्यावर हा माझा निर्णय नसेल, वरिष्ठ जे ठरवतील ते मला मान्य असेल हे मी सांगितले. त्यानंतर मी त्यांना कळवलं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. रात्री १ वाजता मी अमित शाहांना फोन लावला. त्यांच्या कानावर हे घातले तेव्हा माझ्याशी बोलणं झालेलं नाही. आपण हे देऊ शकत नाहीत. तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि आणखी काही मंत्रि‍पदे वाढवून हवी असतील तर ते देऊ पण मुख्यमंत्रिपद देता येणार नाही. त्यानंतर मी उद्धव ठाकरेंना बोललो, माझ्या पक्षाला हे मान्य नाही. आम्ही तुम्हाला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद देऊ शकणार नाही असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते.


तसेच मला ही बोलणी पुढे न्यायची आहेत. त्यानंतर आम्ही निघालो. पुढचे ३ दिवस काहीच झाले नाही. ३ दिवसांनी एका मध्यस्थामार्फत उद्धव ठाकरेंनी निरोप पाठवला. आम्हाला ही बोलणी पुढे करायची आहेत. तुम्ही आम्हाला आणखी काही देऊ शकला तर बोलणी पुढे जातील असं त्यांनी निरोप पाठवला. आम्ही पुन्हा बसलो. त्यावेळी पालघरची जागा आम्हाला द्या, त्यासोबत विधानसभेच्या जागा आमच्या वाढल्या पाहिजे. मागील वेळी १२ मंत्रि‍पदे मिळाली, मात्र यावेळी जास्त मंत्रि‍पदे, कॅबिनेट मंत्री आणि जास्त खाती हवीत असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. त्यावर चर्चा झाली. मात्र हे सगळं अमित शाह यांनी मातोश्रीवर आलं पाहिजे. त्यानंतर पत्रकार परिषद करू असं उद्धव ठाकरे मला बोलले असंही फडणवीसांनी म्हटलं.

दरम्यान, ठरल्याप्रमाणे मी शाह यांच्याशी बोललो, ते ठीक आहे म्हणाले. त्यानंतर मातोश्रीवर गेलो. तिथे ते दोघे बसले, चर्चा केली. त्यानंतर मला आत बोलावले. मला उद्धव ठाकरे म्हणाले, बघा मी युटर्न घेतोय, मी माझ्या शिवसैनिकांना काय सांगणार? तुम्ही पीसीमध्ये एकटं बोला. वक्तव्ये करताना शिवसैनिकांना वाटलं पाहिजे आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. त्यामुळे ही भाषा समसमान करू, याचा अर्थ मंत्रिमंडळात त्यांना अधिकच्या जागा देणे, त्यांना चांगली खाती द्यायची ही चर्चा झाली. आम्ही युटर्न का घेतला, कारण काहीतरी मिळवलं आहे असं वाटायला हवं हे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर वहिनींना बोलावलं, पुन्हा पत्रकार परिषदेत काय बोलायचे हे मी बोलून दाखवले. मग ते हिंदीतही बोलून दाखवले अशी रिर्हसल झाल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

...तर माझा फोन का उचलला नाही ?

आज जे मुख्यमंत्रि‍पदाबाबत उत्तर दिलं ते ६ वर्षात का दिले नाही. खोटं बोलायला रोज नवीन खोटं बोलावं लागते. बहाणे शोधावे लागतात. मी गेली ६ वर्ष काही बोललो नाही. जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पहिली अडीच वर्ष आमचा मुख्यमंत्री होणार होता, मग त्यांनी माझा फोन का उचलला नाही, चर्चा का केली नाही. ५ वर्ष तुम्ही माझ्यासोबत राहिलात मग कमीत कमी फोनवर देवेंद्र तुमच्यासोबत राहायचं नाही हे तरी बोलू शकला असता असा टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ?

ज्यावेळी बाळासाहेबांची प्रकृती खालावत चालली होती. तेव्हा मी त्यांचा हात हातात घेत एक पुत्र म्हणून शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून दाखवेन असं वचन दिलं होते. हे मी का केले, कारण त्यांच्या मनात वाटत असावे, इतके मी उभं केले त्याचे पुढे काय होणार?, मी शिवसेना पुढे नेईन ती जबाबदारी म्हणून मी स्वीकारली. अमित शाहांच्या बैठकीत ते म्हणाले, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री...परंतु मी असं करू नका, त्यातून पाडापाडी होते. त्यामुळे अडीच अडीच वर्ष हे स्पष्ट करावं हे उत्तर मी त्यांना दिले. अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेला दिली तर पक्षप्रमुख म्हणून माझी सही असेल, मुख्यमंत्री म्हणून जो कुणी असेल त्याची सही असेल. पहिली अडीच वर्ष आम्हाला दिली तर ते पत्र मंत्रालयाच्या दारावर लावा असं मी सांगितले हे सगळं ठरलं होते. त्यानंतर हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत आम्ही पदे आणि जबाबदाऱ्या यांचे समसमान वाटप होईल असं जाहीर केले. मुख्यमंत्री हे पदात येते. मग समसमान वाटपाचा अर्थ ज्याला मराठी येते त्याला कळते असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

तर ५ वर्षात एकतर आधी तुमचा मुख्यमंत्री नाहीतर माझा होईल, आधी तुमचा मुख्यमंत्री होत असेल तर मला काही हरकत नव्हती. त्यामुळे तुमचा होईल असं बोलले असेल तर ठीक आहे. काही हरकत नव्हती. आपलं अडीच अडीच वर्षाचं ठरलंय असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.