yuva MAharashtra इंग्रजी येत नाही ? मग, 'जेमिनी' सोबत करा सराव..

इंग्रजी येत नाही ? मग, 'जेमिनी' सोबत करा सराव..



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ मे २०२४
आपल्यापैकी बऱ्याच जणांना इंग्रजी बोलण्याबाबत अडचण येते. कित्येक लोक चांगलं इंग्रजी लिहू-वाचू शकतात. मात्र बोलताना तेवढा आत्मविश्वास नसतो. इंग्रजीचा सराव करण्यासाठी देखील कित्येक जण संकोच करतात, कारण सोबत सराव करायला कोणी नसतं. या सगळ्यावर आता गुगलने एक उपाय दिला आहे. कारण तुम्ही आता गुगलच्या जेमिनी या एआय मॉडेलसोबत इंग्रजी बोलण्याचा सराव करू शकाल. 

हे फीचर सध्या निवडक देशांमध्ये उपलब्ध झालं आहे, ज्यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. हे फीचर गुगलच्या सर्च प्लॅटफॉर्ममध्ये समाविष्ट असून ते इंग्रजी बोलण्याच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला संवादात्मक सराव करण्याचा ऑप्शन देते. भारतासोबतच अर्जेंटिना, कोलंबिया, इंडोनेशिया, मेक्सिको आणि वेनेझुएला या देशांमधील वापरकर्ते या फीचरचा फायदा घेऊ शकतात. 

हे फीचर कसं वापरावं?

गुगलच्या 'Search Labs' प्रोग्राममध्ये सहभागी व्हा.

नोंदणी झाल्यानंतर, 'स्पीकिंग प्रॅक्टिस' फीचर सक्रिय करा.

हे फीचर वापरण्याची थोडी सवय होण्यासाठी काही उदाहरणांचा सराव करा.

'स्पीकिंग प्रॅक्टिस' फीचर' तुमची इंग्रजी कशी सुधारेल?


हे फीचर संपूर्ण इंग्रजी शिकण्याचा पर्याय देत नसेल तरी, संवादात्मक इंग्रजीचा सराव करण्यासाठी उत्तम आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तुमच्याशी रोज़च्या वापरातील संवादांवर आधारित प्रश्न विचारेल. यामुळे तुम्ही नवीन शब्दांचा वापर सहजपणे शिकू शकता. हे फीचर तुम्हाला वेगवेगळ्या स्वरुपाचे प्रश्न विचारेल. यामुळे तुम्ही अगदी सहजतेने संवाद साधू शकता. सध्या हे फीचर चाचणीच्या टप्प्यात आहे, पण भविष्यात भाषा शिकण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. 

इंग्रजी शिकण्यासाठी हे फीचर किती प्रभावी आहे याबाबत अद्याप वाद-विवाद सुरू आहे. तरीही इंग्रजी भाषा शिकण्यासाठीच्या साधनांमध्ये गुगलने केलेला हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. जगभरातील विद्यार्थ्यांना या नव्या फीचरची नक्कीच मदत होणार आहे.