| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ मे २०२४
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडलं, पण मतदानावेळी काही केंद्रांवर गोंधळ पाहायला मिळाला. संथ गतीने होत असलेल्या मतदानावरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि भाजपवर आरोप केले. कल्याण-डोंबिवलीमध्ये मतदार यादीतून नावंच गायब झाल्याच्या बऱ्याच तक्रारी आल्या. या संपूर्ण गोंधळावर महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
'पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात काल मतदान प्रक्रिया संपन्न झाली. मुंबईमध्ये 6 लोकसभा मतदारसंघात 12 हजार पोलिंग बूथ आहेत, तिथे व्यवस्थित प्रक्रिया पार पडली. फक्त 10 ते 12 ठिकाणी स्लो प्रक्रिया होती', असं महाराष्ट्र राज्याचे सहसचिव अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. 'ईव्हीएम आणि इतर अडचणी दूर केल्या. राखीव स्टॉकमधील ईव्हीएम उपलब्ध केल्या गेल्या. राजकीय पक्षांनी केलेल्या आरोपांवर मी बोलणार नाही', असं किरण कुलकर्णी म्हणाले आहेत.
मतदार यादीत घोळ
'मतदानाच्या दिवशी आपलं नाव मतदार यादीत आहे का नाही, हे तपासणं योग्य नाही. सुजाण नागरिकांना हे लक्षात आलं पाहिजे. आम्ही नाव तपासून घेण्यासंदर्भात 21 एप्रिलला जाहिरात दिल्या होत्या. आता त्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, ते विधानसभेला कामाला येईल', असं आवाहन किरण कुलकर्णी यांनी केलं आहे. तसंच नवीन लोकसभा स्थापन होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे. मुख्य सचिवांमार्फत काही प्रस्ताव आमच्याकडे आले होते, ते आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवले. पावसाळ्याआधी काही महत्त्वाची कामं करण्यासंबंधी, याबाबत निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल करण्यासंबंधी परवानगी दिली आहे, मात्र पूर्ण आचारसंहिता शिथिल होणार नाही, अशी माहिती किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.