| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २ मे २०२४
हवेचे दाब यंदा मॉन्सून लवकर येण्याची वर्दी देत आहेत. यंदा प्रचंड उष्णतेच्या लाटांमुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे हवेचे दाब मॉन्सूनच्या प्रगतीस अनुकूल झाले असून, सध्या हा दाब ७०० वरून ८५० हेक्टा पास्कलवर गेल्याने मॉन्सूनच्या हालचालीचे संकेत मिळाले आहेत, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. सर्वांसाठी ही सुखद बातमी आहे.
हवेचा दाब हा 'हेक्टा पास्कल'मध्ये मोजला जातो. हवेचे दाब समुद्रावर १००० हेक्टा पास्कलवर गेले की, मॉन्सूनच्या ढगांची निर्मिती सुरू होते. हवेचे दाब १००६ वर गेले की, हे ढग अंदमानात दाखल होतात. पुढे हे दाब १००८ वर गेले की, मॉन्सून भारतात केरळ किनारपट्टीवर येतो. यंदा हवेचे दाब मॉन्सूनसाठी लवकर अनुकूल होत आहेत, असे निरीक्षण हवामानतज्ज्ञांनी केले आहे.
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार मॉन्सून अंदमानात येण्यास अवघे २१ दिवस उरले आहेत. प्रतिवर्षी मान्सून १८ ते २० मेदरम्यान अंदमानात येतो. त्यानंतर हवेचे दाब अनुकूल झाले, तर यंदा वेळेआधीच तो केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी यंदा दिला आहे. समुद्रावर जेव्हा हवेचे दाब १००६ हेक्टा पास्कलवर जातील, तेव्हा तो अंदामानात दाखल होईल.
हिंदी महासागराचे तापमान आणि हवेचे दाब यावर मॉन्सूनच्या हालचाली ठरतात. यंदा हवेचे दाब मॉन्सूनला आतापासूनच पूरक वाटत आहेत. अंदमानात मॉन्सून २० मेच्या सुमारास येतो. म्हणजेच आणखी २१ दिवस शिल्लक आहेत. हवेचे दाब आणखी वेगाने वाढले, तर तो लवकर येऊ शकतो. राज्यात यंदा सरासरी १०१ टक्के पाऊस होईल. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातही सरासरीहून अधिक पाऊस होईल. असे डॉ. रामचंद्र साबळे, निवृत्त हवामानतज्ज्ञ, पुणे, याने म्हटले आहे.