| सांगली समाचार वृत्त |
मोहोळ - दि. २७ मे २०२४
मोहोळ तालुक्यातील वाळूज, देगाव येथील एका नवरदेवाला बनावट नवरी दाखवून तिच्याशी लग्न लावून आठ दिवसांनंतर मुलीच्या घरी कार्यक्रम असल्याचा बहाणा केला. मुलीस बोलावून घेऊन सोन्या चांदीसह तीन लाख २१ हजारांची फसवणूक केली. या टोळीला मोहोळ पोलिसांनी शक्कल लढवत दुसरे लग्न लावून देण्याच्या बहाण्याने तालुक्यातीलच पेनूर येथे बोलावून घेतले. बनावट नवरदेव उभा केला आणि त्या बनावट नवरी दाखवून फसवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिस यशस्वी ठरले आहेत.
ही घटना २५ मे रोजी पेनूर येथे नक्षत्र लॉन येथे घडली. या टोळीतील आरोपींना येथील न्यायालयात उभे केले असता ५ दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. मोहोळ तालुक्यातील वाळूज, देगाव येथील सचिन विष्णू भोसले (वय ३०) यांच्या लग्नासाठी प्रयत्न चालू होते. मावस भावाच्या ओळखीने नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील लग्न जमविणारा एजंट गंगाधर लाडबा ढेरे याच्याशी संपर्क केला. त्याने मुलगी आहे; परंतु तिच्याबरोबर लग्न जमले तर तुम्हाला २ लाख ५० हजार रुपये आणि ११ हजार गाडी भाडे, असे दोन लाख ६१ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
ठरलेले सर्व पैसे दिल्यानंतर दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास देगाव येथील घरी घरगुती पद्धतीने लग्न पार पडले. त्यानंतर दि. १० एप्रिल रोजी विशाखा हिचे भाऊजी शैलेश यांचा फोन आला की, त्यांचे घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करावयाचा असल्याने बोलावून घेतले. नवरदेवाचे वडील आणि विशाखा या दोघांना रिक्षा करून अकोला बस स्टॅण्डवर नेले व तेथून नवरीसह मुलीचा भाऊजी व नवरी दोघेही गायब झाले. त्यावेळी वडिलांच्या लक्षात आले की, आपली फसवणूक झाली आहे.
फसवणूक झाल्याची माहिती नितीन भोसले यांनी मोहोळ पोलिसांना दिली काही दिवसांनंतरच कॉन्स्टेबल चंद्रकांत आदलिंगे यांच्या सहकार्याने त्या टोळीच्या एजंटाला फोन लावून पंढरपूरमध्ये एक नवरदेव असल्याचे सांगितले लागलीचा टोळीतील लोक दोन गाड्या घेऊन पंढरपूर येथे आले. जवळच मंगल कार्यालय असल्याचे सांगत त्यांना पेनूट येथे येण्यास सांगितले. दरम्यान दिनांक २५ मे रोजी फसवणूक केलेल्या महिला पेनूर येथील नक्षत्र मंगल कार्यालय येथे एका डमी तरुणाशी लग्न लावून देण्यासाठी येत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी मोहोळ पोलिसांची साध्या वेशातील टीम नक्षत्र मंगल कार्यालय पेनूर येथे रवाना केली पोलिसच नातेवाईक बनले. डमी नवर बनवला आणि टोळीला पकडले याबाबत नितीन विष्णू भोसले (वय २५ रा. देगाव. वा) यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास एएसआय आदलिंगे तपास करीत आहेत.
टोळीतील विशाखा हिची मावशी निर्मला पृथ्वीराज बावीस्कर (रा. उल्हासनगर), महिला एजंट लता पदक (रा. राजोरा, संभाजीनगर) व प्रथमेश भोसले याची नवरी म्हणून पिंकी अशोक ढवळे (रा. उल्हासनगर), तिच्यासोबत असलेली महिला आई म्हणून लता धनराज चव्हाण (रा. डोंबविली, जि. ठाणे) या चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर विशाखा श्रीकृष्ण छापानी (रा. नया अकोला, अमरावती) तिचा भावजी शौलेश हे फरार आहेत.