| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ मे २०२४
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून खासदार संजय राऊत यांनी भयंकर आरोप केले आहेत. त्यांच्या लेखातून संजय राऊत यांनी नागपूरमध्ये भाजपश्रेष्ठींनी नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी प्रयत्न केला असा आरोप संजय राऊत यांनी केला. यानंतर फक्त महायुती नाही तर महाविकास आघाडीचे नेते देखील नाराज झाल्याचे दिसून आले. कॉंग्रेसने सडेतोड उत्तर दिल्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर देखील संजय राऊतांविरोधात आक्रमक झाले आहेत. 4 जूननंतर संजय राऊत यांचं थोबाड फुटलेलं दिसेल अशा शब्दांत प्रवीण दरेकर यांनी खडेबोल सुनावले आहेत.
4 जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं असेल
सामनामधील लेखामध्ये संजय राऊत यांनी 4 जूननंतरची मोक्षप्राप्ती असा बातमीचा मथळा दिला आहे. या लेखावर टीका करताना प्रवीम दरेकर म्हणाले, "4 जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला दिसेल. कारण योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत, देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे. हे जाहीर सभांमधून अगदी ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे मोदी-योगी असं चित्र उभं करू नका. संजय राऊत तुम्ही आपल्या पक्षाची आपल्या घराची काळजी करा. हा देश, आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल, हे सर्वश्रुत आहे. संजय राऊत भ्रमिष्ट झालेत म्हणून अशा प्रकारच शोधून शोधून, काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नौटंकी करण्याचा प्रयत्न करतात."असा घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला.
संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस
सामन्याच्या अग्रलेखामध्ये नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी रसद पुरवली होती असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, "सामनाच्या दाव्याला आम्ही काडी मात्र किंमत देत नाही. गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे, संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस. कारण प्रचारात राज्यभर व्यस्त असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आणखी विजय भक्कम व्हावा, यासाठी काय योगदान दिलं आहे ते नागपूरवासियांना माहीत आहे. संजय राऊत यांची दुटप्पी भूमिका आहे. अगोदर बोलायचं विरोधात रसद पुरवली, नंतर बोलायचं प्रचारात उतरले, संजय राऊत टीका करताना सुद्धा काय नेमकं बोलायचंय, हे निश्चित करून घ्या.", असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.