| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ मे २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील, काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यात निवडणूक झाली. मतदानाची मतमोजणी 4 जूनला सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. 25 फेर्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनीचे यांच्यासह उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान सांगली लोकसभा निवडणूक केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात गाजली. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे, निकालावरून पैजा आणि सट्टा बाजार जोरात असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. विशाल पाटील आणि संजय पाटील यांच्या चुरशीच्या प्रचारात महाआघाडीचे पै. चंद्रहार पाटील हे पिछाडीवर पडले. किंबहुना शेवटच्या आठवड्यात त्यांनी मैदानातून माघार घेतल्याचे चित्र व चर्चा दिसून आली. आता सांगली लोकसभा मतदारसंघातून संसदेत कोण पोहोचणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.