| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ मे २०२४
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पिछाडीस हसनी आश्रम परिसरातील गजराज कॉलनीत गेल्या वीस दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिका स्तरावरुन प्रश्नाची सोडवणूक न झाल्याने येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. महापालिका प्रशासनाला शनिवारी येथील नागरिकांनी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वीस दिवसांपासून परिसरात पाणी नाही. २६ व २८ एप्रिल रोजी सायंकाळी कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा झाला. गेल्या वीस दिवसांपासून पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहेत. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही. पाणीप्रश्न सुटत नसेल तर मतदान करायचे कशाला, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे फोन व मेसेजद्वारेही येथील नागरिकांनी तक्रार दाखल केली आहे. महापालिकेत निवेदन देताना हिंदुराव साळुंखे, असिफ मुरसल, अशोक कांबळे, अमृत खंडागळे, राजू शेख, मेहबुब मुल्ला, सलीम राजेवाले, सुनील सदामते, सिद्धू पाटील, गंगुबाई पाटील, पोर्णिमा फोंडे, सुवर्णा बागडी, दत्ता व्हनमाने, विजय व्हनमाने, नामदेव खंडागळे आदी उपस्थित होते.
एमआडीसीच्या लाईनमधून पाणीपुरवठा
या भागास एमआयडीसीच्या चिंतामणराव महाविद्यालयाजवळील सहा इंची कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा केला जातो. या भागात एकूण २१ गल्ल्या आहेत. सध्या इतर भागास एक दिवस आड नियमित पाणी सुरू आहे. उन्हाळ्यातील वाढत्या मागणीमुळे कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. इतर भागांच्या तुलनेत चढावर असलेल्या गल्ल्यांमध्ये खूप कमी पाणी जात असल्याची बाब महापालिकेने मान्य केली.
महापालिका कर्मचाऱ्यांकडून पाहणी
तक्रारीस अनुसरून भाग इन्स्पेक्टर, व्हॉल्वमन यांनी गजरात काॅलनीत पाहणी केली. एमआयडीसी व्यवस्थापनशी चर्चा करून त्यांच्या इतर मोठ्या व्यासाच्या लाईनचे पाणी काही काळासाठी बंद ठेवून शक्य तितका दाब वाढविणेचा प्रयत्न केला जाईल, आवश्यक जागी टँकरने पाणी देण्यात येईल, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले आहे.