| सांगली समाचार वृत्त |
कैसरगंज - दि. २९ मे २०२४
गेल्या काही दिवसांमध्ये सुरू असलेलं अपघातांचं सत्र सुरूच आहे. अशातच यूपीच्या गोंडा जिल्ह्यात, कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार करण भूषण शरण सिंह यांच्या ताफ्यात चालणाऱ्या फॉर्च्युनर वाहनाने दुचाकीवर जाणाऱ्या दोन तरुणांना चिरडलं. रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या एका महिलेलाही या अपघातात दुखापत झाली आहे. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, यावेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी न नेण्यावर ठाम असलेल्या लोकांची पोलिसांशी जोरदार बाचाबाची झाली. खूप प्रयत्न आणि समजूत काढल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर घटनास्थळी उभी असलेली फॉर्च्युनर कार जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याठिकाणी पोलिस मोठ्या संख्येने पोहोचले आणि लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कैसरगंजमधील भाजपचे उमेदवार करण भूषण सिंह ज्या वाहनांमध्ये उपस्थित होते, त्या वाहनांचा ताफा समोर येत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोकांची आक्रमक परिस्थिती पाहून अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस परिक्षेत्र अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची फिर्याद मयत तरुणाच्या नातेवाईकांपैकी चंदा बेगम या महिलेने पोलीस ठाण्यात दिली आहे. ज्यामध्ये फॉर्च्युनर वाहन क्रमांक UP 32 HW 1800 विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये ड्रायव्हरने बेदरकारपणे गाडी चालवताना रस्त्याच्या उजव्या बाजूला येऊन दुचाकीला धडक दिल्याचे म्हटले आहे. यामध्ये दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
प्रभारी निरीक्षक निर्भय नारायण सिंह यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. एसपी विनीत जयस्वाल यांनी सांगितले की, संतप्त लोकांना शांत करण्यात आले आहे. याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे.