मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तसेच हरियाणा या राज्याची विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबरला संपणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा (Hariyana) या दोन्ही राज्यांमध्य एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता आहे. यावर्षी दिवाळीच्या आधीच ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये एकाच वेळी होते विधानसभा निवडणूक
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. ही मुदत संपण्याआधी किंवा त्या मुदत संपण्याच्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असतं. हरियाणा राज्यात 4 नोव्हेंबरपर्यंत नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची विधानसभा निवडणूक 2009 सालापासून एकाच वेळी होत आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही विधानसभांची मुदत 23 दिवसांच्या अंतराने संपत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये एकत्र निवडणूक होऊ शकते. या वर्षी दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे.
सणाच्या काळात शक्यतो निवडणुका घेतल्या जात नाहीत. यंदा दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी मिळाला आहे. मात्र हरियाणा विधानसभेची मुदत आधी संपत आहे. त्यामुळे हरियाणासोबत महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे. याआधी 2019 साली महाराष्ट्र आणि हरियाणा यमध्ये 21 ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाही 21 ते 26 ऑक्टोबरच्या दरम्यान मतदान होऊ शकते.
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणूक
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेसाठीदेखील मतदान झाले. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभेची मुदत 2 जूनला संपणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये 2 जूनला मतमोजणी करुन निकाल जाहीर केला जाईल.
दरम्यान, महाराष्ट्र आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात अद्याप निवडणूक आयोगाने काहीही सांगितलेलं नाही. लवकरच निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची आणि निकालाची तारीख जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे.
🤗🙏🏻✌🏻