| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३१ मे २०२४
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा प्रमुख घटक असणाऱ्या कॉंग्रेसने यावेळी झंझावाती प्रचार मोहीम राबवली. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या बंधू-भगिनीमुळे त्या मोहिमेला आणखीच बळ मिळाले. सभा, मेळावे, रोड शो, मतदारांशी संवाद यांसारख्या प्रचाराच्या विविध कार्यक्रमांत ते सहभागी झाले. राहुल यांनी १०७, तर प्रियंका यांनी १०८ प्रचार कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.
राहुल यांनी स्वत: यावेळीही २ मतदारसंघांमधून लोकसभा निवडणूक लढवली. केरळच्या वायनाड आणि उत्तरप्रदेशच्या रायबरेलीतून ते मैदानात उतरले. तसे असूनही स्टार प्रचारक म्हणून त्यांनी अनेक राज्यांत कॉंग्रेसचा प्रचार केला. त्यांनी इंडिया आघाडीतील विविध घटक पक्षांच्या नेत्यांसमवेत संयुक्त प्रचार सभाही घेतल्या.
यावेळी प्रियंका स्वत: निवडणूक लढवतील अशा चर्चा प्रारंभी होत्या. मात्र, तसे घडले नाही. त्यातून स्टार प्रचारक म्हणून कॉंग्रेस प्रियंका यांच्यावर प्रचाराची अधिकाधिक जबाबदारी सोपवणार असल्याचे सूचित झाले. प्रियंका यांनी १६ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पक्षाचा प्रचार केला. त्याशिवाय, गांधी परिवाराचे पारंपरिक बालेकिल्ले मानल्या गेलेल्या रायबरेली आणि अमेठीत त्या जवळपास पंधरवडाभर तळ ठोकून होत्या.
राहुल आणि प्रियंका यांनी कॉंग्रेसच्या प्रचारात भरीव योगदान दिले. मात्र, प्रचाराच्या आघाडीवर भाजपचा मुख्य आधार असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या बंधू-भगिनीला बरेच मागे टाकले. मोदी प्रचाराशी संबंधित २०६ कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. त्यांची संख्या जवळपास राहुल आणि प्रियंका यांच्या एकत्रित प्रचार कार्यक्रमांइतकी भरते.