| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ मे २०२४
महाविकासआघाडीचं जागावाटप पार पडलं, मात्र या जागावाटपानंतरही सांगली लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या तिढ्यामुळं मविआत आलबेल नसल्याचं समोर आलंय. मविआचं जागावाटप जाहीर होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली, विशेष म्हणजे या जागेवर काँग्रेसनं दावा सांगितलेला होता. सांगलीच्या उमेदवारीबाबत पवारांनी म्हत्वाचं विधान केलंय, त्याला नाना पटोले यांनीही दुजोरा दिला आहे.
सांगलीची अशी एकच जागा आहे जिथे आमचा चर्चा न होताच निर्णय झाला, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. तर जयंत पाटलांनीही या जागेच्या उमेदवाराबाबतच्या निर्णयाशी आपला काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. या मतदारसंघात बऱ्याच चर्चा होतात. सगळ्यांना असं वाटतं की मीच चंद्रहार पाटलांना तुम्हाला उमेदवारी द्यायला लावली, असं जयंत पाटील म्हणाले.
राज्यात मविआचं जागावाटप सुरळीत पार पडलं असलं तरी सांगलीच्या जागेवरून मविआतील विसंवादच समोर आलाय. सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी एकमेकांवर थेट शाब्दिक प्रहार करायला सुरूवात केलीय. अपक्ष उमेदवार विशाल पाटील भाजपची बी टीम असल्याचा आरोप चंद्रहार पाटील यांनी केलाय. तर चंद्रहार पाटील यांनी कोणत्याही बँका बुडवलेल्या नाहीत, असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. परिणामी विशाल पाटील गटाकडूनही हिशेब चुकता करण्यात आला.
विशाल पाटील भाजपचा फायदा व्हावा म्हणून निवडणूक लढवत असल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केलाय. संजय राऊतांनीही त्यांचीच रि ओढली आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटील यांच्या आरोपांना जास्त महत्व देत नसल्याचं सांगितलं. दरम्यान, काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी कोल्हापुरात उद्धव ठाकरेंची भेट घेत चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार असल्याचं म्हटलंय.
काँग्रेस नेत्याचा दबाव?
सांगलीत बंडखोरी करण्यासाठी माझ्यावर राज्यातील काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याचा दबाव असल्याचंही विश्वजीत कदम यांनी बैठकीत सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. विश्वजीत कदम यांनी कोल्हापूरच्या हॉटेल सयाजीमध्ये उद्धव ठाकरेंची भेट घेतली.