yuva MAharashtra "जर-तर" च्या खेळात काँग्रेसचे नेते जयंतरावांचे नेतृत्व मान्य करणार का ?

"जर-तर" च्या खेळात काँग्रेसचे नेते जयंतरावांचे नेतृत्व मान्य करणार का ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १० मे २०२४
जयंतराव पाटील एक "बेरकं" नेतृत्व ! 
काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर, सांगली जिल्ह्यातून जे नेते त्यांच्याबरोबर गेले, यामध्ये जयंत पाटील हे आघाडीवर होते. त्याची फळेही विविध पदांच्या रूपाने जयंत पाटील यांना चाखता आली.

स्वतःचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व अबाधित राहावं म्हणून ज्या काही क्लुप्त्या, कलुंगडी, पेचडावपेच, प्रतिस्पर्ध्याला गारद करण्यासाठी खेळाव्या लागणाऱ्या चाली "करेक्ट कार्यक्रम" म्हणून राजकीय क्षेत्रात प्रसिद्ध. या 'करेक्ट कार्यक्रमाचा फटका' अनेक राजकीय नेत्यांना बसला. जयंतरावांच्या चालीने या नेत्यांना बॅकफूटवर जावे लागले. याचे सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे स्व. आर आर पाटील, स्व. मदन भाऊ पाटील आणि काँग्रेसमधील, इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीतीलही अनेक नेत्यांची नावे घ्यावी लागतील. जेव्हा जेव्हा 'वेळ' आली, तेव्हा तेव्हा 'काँग्रेसचा हात' आणि राष्ट्रवादीच्या 'घड्याळातील काटे' उलटे फिरवण्यात जयवंतरावांनी कुठलीही कसर सोडली नाही. हा सार्वत्रिक आरोप जयंतरावांच्यावर होत असतो.


विशेषतः दादा घराण्याशी जयंतरावांचे कमालीचे वैरत्व असल्याचे सारे राज्य जाणतो. जयंतरावांनी याचा कितीही इन्कार केला तरी, त्यांनी खेळलेल्या पडद्याआडच्या चाली लपून राहिल्या नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 2019 ची आणि नुकतीच पार पडलेली लोकसभेची निवडणूक. कथितरीत्या विशाल पाटील यांची उमेदवारी डावलण्यामागे जयंतरावांनी पेरलेले काटेच कारणीभूत असल्याची उघड उघड चर्चा सर्वत्र रंगली होती.

या साऱ्या पार्श्वभूमीवर सध्या एक चर्चा रंगते आहे ती म्हणजे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राजकारणातील धुरंदर नेते म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्या मा. शरद शरद पवार यांनी फोडलेला 'राजकीय बॉम्ब'... 'निवडणुकीनंतर अनेक छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील !' या वक्तव्याने राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात राजकीय भूकंप घडला. याचा केंद्रबिंदू 'मुंबई' असला तरी त्याचे धक्के देशभरातील अनेक पक्षांना व पक्ष नेत्यांना जाणवले. पण खरी चर्चा रंगली ती, ' खरंच राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झालाच तर राज्यात काय होणार ?' 

मा. शरद पवार हे कुठलीच राजकीय तडजोड अटीशिवाय करीत नाहीत. आणि आता त्यांच्या मनात राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करायचे असेल, तर त्यांच्याबरोबर असलेल्या निष्ठावंत नेत्यांना  होणारा  फायदा काय  असेल ? यामध्ये सर्वात आघाडीचे नाव आहे ते 'जयंत पाटील' यांचे. हे दोन पक्ष एकत्र आलेच तर शरद पवार जयंतरावांना राज्याचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी काँग्रेसच्या हाय कमांडला भाग पाडू शकतात. अशावेळी जयंतरावांच्या 'राजकीय चालीचा' फटका काँग्रेसमधील ज्या नेत्यांना बसला, ते नेते "जयंतरावांचे नेतृत्व मान्य करणार का ?" आणि सध्या या प्रश्नांचे मोहोळ अधिकतर सांगली जिल्ह्यातील डॉ. विश्वजीत कदम व विशाल पाटील यांच्या भोवती फिरताना दिसत आहे. कारण आतापर्यंतच्या राजकारणात, जयंतरावांच्या राजकीय खेळीचा फटका सांगली जिल्ह्यातील अनेक नेत्यांपेक्षा या दोघांनाच मोठ्या प्रमाणात बसला असल्याचे बोलले जाते. आणि म्हणूनच या "जर तर" च्या खेळात डॉ. विश्वजीत कदम व विशाल पाटील यांचा निर्णय काय असेल ?... आणि म्हणूनच याबाबतची चर्चा सध्या सांगली जिल्ह्यात सर्वत्र रंगली आहे.